इथल्याही पुलांना ‘सावित्री’चं भय...

By Admin | Updated: August 4, 2016 01:30 IST2016-08-04T00:15:38+5:302016-08-04T01:30:11+5:30

जिल्ह्यातील १० पेक्षाही जास्त पूल ब्रिटिशकालीन

All the bridges here fear the 'Savitri' | इथल्याही पुलांना ‘सावित्री’चं भय...

इथल्याही पुलांना ‘सावित्री’चं भय...

सातारा : महाडच्या ‘सावित्री’ नदीनं तब्बल ३० जणांना पोटात घेतल्यानंतर ब्रिटिशकालीन पुलांचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. विशेष म्हणजे, सातारा जिल्ह्यातील तिच्याच भगिनी असणाऱ्या नद्यांवरील जुन्या पुलांचा वापर आजही जनतेच्या नाकावर टिच्चून केला जातोय. अनेक पुलांनी ‘शंभरी’ गाठलीय. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नोंदीनुसार यातील काही पूल ‘गुड कंडिशन’मध्ये असले तरी कोणत्याही क्षणी या पुलावर ‘महाड’सारखी दुर्घटना घडू शकते. जुने पूल पाडून नवीन वाहतूक व्यवस्था निर्माण करा, ही सर्वसामान्य सातारकरांची आर्त हाक आजपावेतो शासकीय यंत्रणेपर्यंत पोहोचलीच नाही. म्हणून ‘लोकमत टीम’ने जिल्ह्यात प्रत्येक ब्रिटिशकालीन पुलाचा घेतलेला शोध...

सातारकर धाडसी की यंत्रणा बेफिकीर ?
धोकादायक पुलावरून प्रवास : बांधकाम विभागाकडे ‘गुड कंडिशन’ म्हणून नोंद
जावेद खान-साताऱ्यातील संगमनगर येथील कृष्णा नदीवरील कृष्णा पुलाला १०० वर्षे पूर्ण झाली असूनदेखील या पुलाला अद्यापही धोका नसल्याचे बांधकाम विभागाने सांगितले असले तरी पुलाला भिंतीमध्ये वाढतच जाणाऱ्या पिंपळाच्या झाडांची मुळे खोलवर रुजून बांधकाम ठिसूळ करण्याच्या मार्गावर आहेत. तर पुलावर पडलेल्या खड्ड्यात वाहने आदळत असल्याने पुलावर मोठे दणके बसत असल्याने या पुलाच्या सुरक्षिततेबाबत नागरिकांतून प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
महाड येथील ब्रिटिश काळातील पूल वाहून गेला. यामध्ये दोन एसटी बसेस प्रवाशांसह वाहून गेल्याची भीती व्यक्त होत असताना मात्र सातारकरांना कृष्णा पुलाबाबत काळजी वाटू लागली आहे. दि. २८ जून १९१५ रोजी या पुलाचे बांधकाम करण्यात आले होते. त्यानुसार जून २०१५ रोजी या पुलाला १०० वर्षे पूर्ण झाली असून, या पुलाबाबत वैधता संपल्याचे ब्रिटिशांचे पत्रही बांधकाम विभागाला आले होते. परंतु बांधकाम विभागाने या पुलाची पाहणी करत अजून काही वर्षे या पुलाला कोणताच धोका नसल्याचे सांगितले आहे. तरी देखील आजच्या घटनेमुळे सातारकरांना या पुलाबाबत काळजी वाटू लागली आहे.
एकूण ७ कमानी असलेला दगडी पूल हा साताऱ्याच्या कृष्णा नदीत वैभवाला भर टाकत आहे. सध्या या पुलाच्या दोन्ही बाजूस काही ठिकाणी पिंपळाची झाडे वाढत आहेत. यांची मुळे दगडाच्या खाचांमधून खोलवर रुजली आहेत. तर पुलाच्या रस्त्यावरच मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे येथून येणारे प्रत्येक वाहन जागो-जागी खड्ड्यात आदळत असून, याचा दणकाही पुलाला बसत असल्याने हा पूल रहदारीला कितपत सुरक्षित असू शकतो, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होऊ लागला आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित असलेल्या पुलांव्यतिरिक्त जिल्ह्यातील नगरपालिका व ग्रामपंचायतींच्या हद्दीत असणारे जुने पूलही धोकादायक ठरत आहेत. या बाबीकडे संबंधित विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे.


ब्रिटिश एजन्सीचे पत्र
‘लोकमत’ने या धोकादायक पुलांबाबत वेळोवेळी आवाज उठवला आहे. ब्रिटिश एजन्सीने यातील बहुतांश पुलांबाबत प्रशासनाला पत्र पाठवून सजग केले असले तरीही बांधकाम खात्याच्या दफ्तरी यापैकी बहुसंख्य पुलांची नोंद ‘इन गुड कंडिशन’ अशी असल्याचे वास्तव समोर येत आहे.


महाडच्या दुर्घटनेनंतर सातारा जिल्ह्यातील ब्रिटिशकालीन पुलांचा तातडीने सर्व्हे करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत. यापूर्वीचे रिपोर्ट काय आहेत, यावर विसंबून राहण्यापेक्षा आजच्या क्षणी जिल्ह्यातील जुन्या पुलांची अवस्था जाणून घेणे गरजेचे आहे. त्यादृष्टीनेच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी ब्रिटिशकालीन पुलांचे सर्वेक्षण सुरु केले आहे. सातारा-कोरेगाव रस्त्यावरील माहुली पुलाचा अभ्यास मे महिन्यात केला असला तरी आज पुन्हा एकदा या पुलाच्या सुरक्षिततेविषयी अभ्यास करण्यात आला आहे. नवीन पुलाच्या बांधकामासाठी लवकरात लवकर प्रक्रिया राबविण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.
- अश्विन मुदगल,
जिल्हाधिकारी, सातारा

Web Title: All the bridges here fear the 'Savitri'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.