दारूच्या बाटलीला मारले जोडे!
By Admin | Updated: January 1, 2015 00:14 IST2014-12-31T22:18:39+5:302015-01-01T00:14:33+5:30
अभियानाला सुरुवात : परिवर्तन व्यसनमुक्ती संस्थेचा अभिनव उपक्रम

दारूच्या बाटलीला मारले जोडे!
सातारा : वर्षाअखेरीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील तरुणाईने वेगळी वाट चोखाळत २९ डिसेंबर ते ५ जानेवारी या सप्ताहात चालणाऱ्या ‘व्यसनविरोधी युवा’ अभियानाचा दारूच्या बाटलीला जोडे मारून प्रारंभ केला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, परिवर्तन व्यसनमुक्ती संस्था, विवेकवाहिनी तसेच राष्ट्रीय सेवा योजना सातारा जिल्हा यांच्या संयुक्त प्रयत्नातून हे अभियान सुरू झाले.
युवकांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स, सातारा येथे आयोजित व्यसनविरोधी युवा निर्धार परिषदेद्वारे या अभियानाची सुरुवात झाली. यावेळी परिवर्तन संस्थेचे डॉ. हमीद दाभोलकर, प्रा. ए. एन. यादव, प्रा. एस. एन. जाधव, प्रा. आर. व्ही. यादव, प्रशांत पोतदार उपस्थित होते.
डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले, ‘तरुणाईमध्ये उर्मी असते, ती चांगल्या अर्थाने वापरून त्यांनी व्यसनमुक्तीचे दूत बनावे. स्वत: व्यसनापासून दूर राहावेच; पण इतरांनाही व्यसनाच्या समस्येतून सोडविण्यासाठी मदत करावी.’
परिषदेत १३ वर्षे व्यसनाधीन राहून आता पूर्ण व्यसनमुक्त असलेल्या रवींद्र गायकवाड व त्यांच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या त्यांच्या पत्नी यांची मुलाखत उदय चव्हाण व किशोर काळोखे यांनी घेतली.
समवस्कांच्या दबावातून आपल्याला व्यसन कसे लागले, व्यसनामुळे आपले आयुष्य कसे अंधाराच्या खाईत ढकलले गेले होते; पण व्यसनमुक्तीच्या उपचाराने आपण सावरलो व आता कशा प्रकारे व्यसनमुक्त आयुष्य जगत आहोत, याचा प्रत्यक्ष अनुभव या मुलाखतीदरम्यान गायकवाड दाम्पत्याने मांडले.
तरुणांनी व्यसनापासून दूर राहावे, असे आवाहन त्यांनी उपस्थित युवकांना केले. याअंतर्गत विविध कार्यक्रम आयोजित केले. (प्रतिनिधी)
‘दारू सुटल्यावर केला दागिना
व्यसनामुळे दागिने देखील गहाण ठेवायला लागले होते; पण व्यसनमुक्त होऊन पतीने तीन तोळे सोने केले व मंगळसूत्राला अर्थ प्राप्त करून दिला,’ अशी भावना रवींद्र गायकवाड यांच्या पत्नीने व्यक्त केली.
परिषदेत २५० तरुण-तरुणींनी व्यसनमुक्ती दूत बनण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. येत्या सप्ताहामध्ये त्यांच्या मार्फत समाजात व्यसनविरोधी प्रबोधन करण्याचा निर्धार करण्यात आला.