बाबांच्या प्रचाराला शह देण्यासाठी अजितदादांची सभा
By Admin | Updated: April 7, 2016 00:02 IST2016-04-06T21:51:30+5:302016-04-07T00:02:04+5:30
विविध राजकीय पक्षांकडून राज्य व जिल्हा पातळीवरील नेत्यांच्या मंत्री, आमदार, खासदार व पदाधिकाऱ्यांच्या प्रचारसभांचा, दौऱ्याचा आस्वाद लोणंदकरांना घेता येणार

बाबांच्या प्रचाराला शह देण्यासाठी अजितदादांची सभा
मुराद पटेल -- शिरवळ -लोणंद नगरपंचायतीच्या निवडणुकीची तारीख जशी जवळ येत आहे, तशी राजकीय पक्षांकडून व उमेदवारांकडून प्रचाराचा धुरळा उडविण्यास सुरुवात झाली आहे. आगामी काळात विविध राजकीय पक्षांकडून राज्य व जिल्हा पातळीवरील नेत्यांच्या मंत्री, आमदार, खासदार व पदाधिकाऱ्यांच्या प्रचारसभांचा, दौऱ्याचा आस्वाद लोणंदकरांना घेता येणार आहे.यामध्ये भाजपतर्फे राज्यपातळीवरील बड्या नेत्यांची फौज प्रचाराच्या मैदानात उतरवण्यात आले आहे. जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्यासह उपाध्यक्ष अनुप शहा, जि. प. सदस्य दीपक पवार, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, भरत पाटील, पुरुषोत्तम जाधव, अनुप सूर्यवंशी आदींच्या प्रचारसभा, कोपरासभा होणार आहेत. काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील व आमदार जयकुमार गोरे यांच्या सभांचा पाऊस होणार आहे. शिवसेनेकडून अद्यापही तळ्यात-मळ्यात सुरू असून, प्रचारसभांना कोण येणार, याबाबत स्पष्ट सांगण्यात येत नसले तरी पालकमंत्री विजय शिवतारे यांना प्रचारसभांसाठी आणण्याकरिता प्रयत्न सुरू आहे. स्थानिक पातळीवरील संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील, जिल्हाप्रमुख नंदकुमार घाडगे, उपजिल्हाप्रमुख विराज खराडे, राजेश कुंभारदरे, तालुकाप्रमुख संजय देशमुख प्रचाराची धुरा सांभाळणार. राष्ट्रवादीतर्फे आमदार मकरंद पाटील यांच्या व्यूहरचनेवर विश्वास ठेवून आमदार शशिकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष सुनील माने, नितीन भरगुडे-पाटील, राजेंद्र तांबे, रमेश धायगुडे, दत्तानाना ढमाळ यांच्यावर प्रचार मोहीम राबविण्याचे नियोजन केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या सभेला प्रत्युत्तर म्हणून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारसभेचे नियोजनही राष्ट्रवादीकडून केले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, सेनेकडून पक्षाच्या नेत्यांना प्रचारसभेत उतरवण्यात आल्याने प्रचाराच्या तोफा धडाडणार आहेत.
अबब.. अर्धा डझन मंत्रीही येणार प्रचारात !
यामध्ये प्रामुख्याने प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रचारसभेच्या माध्यमातून लोणंदकरांना सामोरे जाणार आहेत. तर अन्न व पुरवठामंत्री गिरीश बापट, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, गृहराज्यमंत्री प्रा. राम शिंदे, भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकर, सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांच्या सभा होणार आहेत. तर सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सभा होणार आहेत.