अजिंक्यताऱ्याचा कारभार पुरंदरगडावरुन !
By Admin | Updated: November 5, 2015 23:54 IST2015-11-05T22:47:05+5:302015-11-05T23:54:46+5:30
जिल्ह्याचा कारभार हाकणार कसा? : तब्बल पावणे दोन महिन्यांनंतर पालकमंत्री साताऱ्यात

अजिंक्यताऱ्याचा कारभार पुरंदरगडावरुन !
सातारा : पालकमंत्री विजय शिवतारे सध्या साताऱ्यात येणे टाळत असल्याची जोरदार चर्चा आहे. गेल्या नियोजन विभागाच्या बैठकीला आजच्या घडीला १ महिना २० दिवस झाले आहे. एवढ्या प्रदीर्घ कालावधीनंतर जिल्ह्याचे पालकमंत्री गुरुवारी रात्री साताऱ्याच्या विश्रामगृहावर दाखल झाले. मधल्या काळात जिहे-कटापूर योजनेला निधी मंजूर केल्याचे त्यांनी काढलेले पत्रक भलतेच वादग्रस्त ठरले होते. या पत्रकानंतर साताऱ्यात घडलेल्या महाभारताची माहिती त्यांनी ‘संजया’मार्फत घेतली. सध्या त्यांचा कारभार पुरंदरातून अजिंक्यताऱ्यावर ‘वॉच’असाच सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर हा शिवतारेंचा मतदारसंघ. राष्ट्रवादीला लाथ मारून ते काही वर्षांपूर्वी बाहेर पडले, (असं ते सांगतात.) योगानं महाराष्ट्रात शिवशाहीची सत्ता आल्यानं संघर्षाची पार्श्वभूमी असणाऱ्या शिवतारेंना जलसंपदा विभागाचं राज्यमंत्रिपद मिळालं. आणि शिवसेनेचा केवळ एक आमदार असणाऱ्या सातारा जिल्ह्याचं पालकमंत्रिपदही. राष्ट्रवादीचे प्राबल्य असणाऱ्या साताऱ्यात शिवतारेंना खिंडीत पकडण्यासाठी मोठी फौज कामाला लागली. मात्र, जिहे-कटापूर आणि साताऱ्याचे शासकीय मेडिकल कॉलेज, हे दोन प्रकल्प उभे करण्याची भीष्मप्रतिज्ञा केलेल्या शिवतारेंनी प्रशासनाच्या मदतीने जोरदार हालचाली केल्या. साहजिकच साताऱ्याच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुगीचे दिवस आले आहे. त्यांच्या चेहऱ्यावरच्या काळजीच्या रेषा काहीशी पुसल्या आहेत.
पालकमंत्री झाल्यानंतर शिवतारे वारंवार जिल्ह्यात येऊन दौरा करत होते. पोवई नाक्यावर नव्याने सुरू केलेल्या शिवसेना पक्ष कार्यालयात येऊन जनतेसाठी वेळ देणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले होते. पण, अद्याप त्यांना तसा वेळ काढता आलेला नाही. सुरुवातीला ते उत्साहाने वेळ काढून साताऱ्यात येत होते. मात्र आता मागील जिल्हा नियोजन बैठकीनंतर तब्बल दीड महिन्याच्या कालावधी उलटून गेल्यावर ते साताऱ्यात आले. पालकमंत्री आपले दौरे का लांबवत आहेत?, याचे कोडे जनतेला पडले आहे. याउलट राष्ट्रवादीचे विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व त्यांच्या पक्षाच्या इतर मोठ्या पदाधिकाऱ्यांचे दौरे साताऱ्यात जास्त होत आहेत. साहजिकच सत्ता शिवसेना-भाजपची असली तरी अद्याप राष्ट्रवादीच सत्तेवर आहे की काय?, असा पेच सामान्यांना सतावत आहे. शिवसैनिक सत्तेत असूनही सत्तेत नसल्यासारखे तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सत्ता जाऊनही सत्तासोपानाला चिकटून बसल्याचा भास सर्वसामान्य जनतेला होतोय.
दरम्यान, पालकमंत्र्यांनी जिहे-कटापूर साठी निधी मंजूर केल्याचे पत्रक माहिती कार्यालयामार्फत प्रसिध्दीला दिले. त्यानंतर माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी पालकमंत्री चुकीची माहिती देत असल्याचा आरोप केला. त्याला पालकमंत्र्यांनी उत्तर दिले नाही, तर भात्यातले बाण सावरत रणजितसिंह देशमुख यांनी त्याला प्रत्युत्तर दिले. आ. शशिकांत शिंदे यांनी तर सुरुवातीला पालकमंत्र्यांवर टीका केली व दुसऱ्याच दिवशी पालकमंत्र्यांचे श्रेय मान्य केले. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अथवा माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांचे श्रेय नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी भाजपला निशाणा बनविले. शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षांतील अंतर्गत धूसफुशीत मीठ टाकल्यानंतर चर्रऽऽऽर्र आवाज झाला. येळगावकरांनी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन शिंदेंवर जहाल टीका केली.
विशेष म्हणजे, हे सर्व होत असताना पालकमंत्री मात्र पुरंदरच्या किल्ल्यातून अजिंक्यताऱ्यावर घडत असलेल्या घडामोडींकडे नुसते पाहात राहिले.
महाभारतात उडी न घेता ‘संजया’मार्फत त्यांनी केवळ वॉच ठेवला. यात आपल्याला कामाशी मतलब फालतू आरोप-प्रत्यारोपांमध्ये आपण पडायचे नाही, असा त्यांचा होरा असावा. अथवा दुसऱ्याच दिवशी आ. शिंदेंनी श्रेय देऊन टाकल्याने विषय मिटलाय, असा विचार त्यांच्या मनात असावा. (प्रतिनिधी)
‘चंद्र’ आहे...साक्षीला!
शिवसेनेचे दोन जिल्हाध्यक्ष आपापल्या सुब्यात अडकून पडले असताना उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव मात्र पूर्ण वेळ शिवसेनेच्या पोवई नाक्यावरील कार्यालयात उपस्थित असतात. त्यामुळे त्यांच्या साक्षीनेच अनेक घडामोडी घडत आहेत. त्यामुळे ‘चंद्र आहे साक्षीला...’असं म्हणून पालकमंत्री निर्धास्तपणे पुरंदरात तळ ठोकून आहेत, अशी चर्चाही साताऱ्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.