कृषी निविष्ठा विक्रेत्यांना अग्रक्रमाने लस मिळणार : बाबर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:38 IST2021-05-10T04:38:45+5:302021-05-10T04:38:45+5:30
दहिवडी : ‘शेतकऱ्यांचे हित लक्षात घेत खते, बियाणे आदी कृषी निविष्ठा विक्रेत्यांना अग्रक्रमाने कोरोना प्रतिबंधक लस मिळणार ...

कृषी निविष्ठा विक्रेत्यांना अग्रक्रमाने लस मिळणार : बाबर
दहिवडी : ‘शेतकऱ्यांचे हित लक्षात घेत खते, बियाणे आदी कृषी निविष्ठा विक्रेत्यांना अग्रक्रमाने कोरोना प्रतिबंधक लस मिळणार आहे,’ अशी माहिती कृषिरत्न विश्वंभर बाबर यांनी दिली.
कृषी निविष्ठा विक्रेत्यांना अग्रकमाने कोरोना प्रतिबंधक लस मिळावी, अशी मागणी कृषिरत्न विश्वंभर बाबर यांनी राज्य शासन व जिल्हाधिकाऱ्यांकडे एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला लेखी स्वरुपात केलेली होती.
खरीप हंगाम अगदीच जवळ आलेला आहे. खरीप हंगामाच्या यशस्वी नियोजनासाठी कृषी निविष्ठा विक्रेता व त्याची टीम महत्त्वाची आहे. केंद्र शासनाने कृषी निविष्ठा विक्री केंद्रांचा समावेश यापूर्वीच अत्यावश्यक सेवेमध्ये केलेला आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर बियाणे दुकानांमध्ये जास्त गर्दी होणे अपेक्षित आहे. त्यातून कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची भीती आहे. या व आदी बाबी गृहित धरून राज्य कृषी विभागाने कोरोना लसीबाबत एक महत्त्वपूर्ण आदेश काढला आहे. कृषी आयुक्त राज्य शासन, पुणे यांनी दिनांक ६ मे रोजी एक महत्त्वपूर्ण आदेश काढला असून, त्याद्वारे निविष्ठा विक्रेता व त्यांच्या कर्मचाऱ्यांचा समावेश फ्रंटलाईन वर्कर अंतर्गत केलेला आहे. या आदेशाची प्रत संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांमार्फत स्थानिक आरोग्य विभागाला देण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण आदेशामुळे जिल्ह्यातील सर्व कृषी निविष्ठा विक्रेते व त्यांच्या कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिकारक लस अग्रक्रमाने मिळणार असल्याची माहिती कृषिरत्न विश्वंभर बाबर यांनी दिली.