कोयना धरणग्रस्तांचे सलग चौथ्या दिवशीही आंदोलन सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:41 IST2021-05-21T04:41:42+5:302021-05-21T04:41:42+5:30
कोयनानगर : श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली कोयना धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्त आंदोलनाच्या चौथ्या दिवशी आंदोलनस्थळी कोयनानगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस ...

कोयना धरणग्रस्तांचे सलग चौथ्या दिवशीही आंदोलन सुरू
कोयनानगर : श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली कोयना धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्त आंदोलनाच्या चौथ्या दिवशी आंदोलनस्थळी कोयनानगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत माळी यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान माळी यांनी धरणग्रस्तांच्या व अभयारण्यग्रस्तांच्या व्यथा जाणून घेतल्या व सुरू असलेल्या आंदोलनाबाबत शासनास अहवाल पाठविण्याबाबत चर्चा केली.
श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली कोयना धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्तांचे सोमवार (दि. १७) आंदोलन सुरू आहे. ते गुरुवारीही सुरू आहे. या आंदोलनात सातारा, सांगली, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांतील प्रकल्पग्रस्त सहभागी झाले आहेत. गावोगावी सुरू झालेल्या आंदोलनात लोकांच्या सहभाग वाढत आहे. या आंदोलनाचे लोण संपूर्ण महाराष्ट्रभर पसरून राज्य शासनाला व सातारा जिल्ह्यातील प्रशासनाला यावर नक्कीच निर्णय घ्यावा लागेल. तसेच झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी लागेल. चौथ्या दिवशीही प्रशासनाची कोणतीही हालचाल दिसत नसल्याने आंदोलनाची तीव्रता वाढत राहील, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.