अथक प्रयत्नानंतर नीरामाई खळाळली

By Admin | Updated: May 10, 2017 22:52 IST2017-05-10T22:52:18+5:302017-05-10T22:52:18+5:30

अथक प्रयत्नानंतर नीरामाई खळाळली

After tireless efforts, the niramai broke | अथक प्रयत्नानंतर नीरामाई खळाळली

अथक प्रयत्नानंतर नीरामाई खळाळली


लोकमत न्यूज नेटवर्क
खंडाळा : खंडाळा तालुक्याच्या कृषी, औद्योगिक क्षेत्राबरोबरच सामाजिक जीवनात परिवर्तन घडण्यासाठी नीरा-देवघर आणि धोम-बालकवडी प्रकल्पाचा मोठा वाटा आहे. त्यामुळेच नीरा -देवघरच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांनी देव पाण्यात घालून प्रतीक्षा केली. खंडाळ्याच्या पूर्व भागातील पाणीटंचाई कायमची मिटण्यासाठी हे पाणी वाघोशीपर्यंत पोहोचणे गरजेचे होते. अथक प्रयत्नानंतर नीरामाई वाघोशीत खळाळली अन् ग्रामस्थांचा आनंद गगनात मावेनासा झाला. आता गावोगावी पाणीपूजन करून आनंद साजरा केला जात आहे.
नीरा-देवघरचे पाणी मिळण्याची प्रतीक्षा आता संपली असून ६७ किलोमीटरपर्यंतची कालव्याची कामे पूर्ण करून तब्बल १७ वर्षांनंतर पाणी वाघोशीच्या शिवारात पोहोचले. त्यामुळे १७ वर्षांच्या वनवासानंतर वाघोशीकरांची तहान भागली अन् ग्रामस्थांचा आनंद द्विगुणित झाला. खंडाळा तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांची व शेतकऱ्यांची पाण्याची गरज लक्षात घेऊन मोर्वे येथील पुलावर तात्पुरत्या सिमेंट पाईप टाकून त्याद्वारे वाघोशी गावापर्यंत नीरा-देवघर कालव्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे. नीरा-देवघर धरणाचे पाणी रविवारी वाघोशी गावामध्ये पोहोचले आहे. हे पाणी पाहण्यासाठी नागरिक वाघोशी येथे मोठी गर्दी करत आहेत.
नीरा-देवघर धरणाच्या लाभ क्षेत्रातील गावांना धरण बांधल्यापासून पाण्याची प्रतीक्षा होती. मात्र नीरा-देवघरचे पाणी पूर्व भागासाठी मृगजळ ठरत होते. नीरा-देवघर धरणाच्या कालव्याचे खंडाळा तालुक्यातील हायवेपर्यंत काम पूर्ण झाले होते. मात्र, हायवे क्रॉसिंग व मोर्वे येथील जमीन संपादनाचे काम अनेक वर्षांपासून रखडल्याने नीरा-देवघरचे पाणी खंडाळा तालुक्यात येत नव्हते. राज्य विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व आमदार मकरंद पाटील यांच्याकडे तालुक्यातील जनता ‘काहीही करा; पण नीरा-देवघरचे आमच्या हक्काचे पाणी आम्हाला द्या,’ अशी वारंवार मागणी करत होती. त्यामुळे काहीही करून नीरा-देवघरचे पाणी वाघोशीपर्यंत खंडाळा तालुक्यात आणण्याचा सकंल्प केला होता. आमदार मकरंद पाटील यांनी लक्ष घातल्यामुळेच नीरा-देवघरचा कालवा हायवे क्रॉस करू शकला. तसेच मोर्वे येथे धरणाच्या कालव्यासाठी जमीन संपादन करण्याचा प्रश्न देखील अनेक दिवसांपासून रखडला होता. हा प्रश्न देखील मार्गी लागला आहे. हे दोन प्रश्न मार्गी लागल्यावरच नीरा-देवघरच्या कालव्याच्या खंडाळा तालुक्यातील कामाला गती मिळाली आहे. पाण्यासाठी मतदानावर बहिष्कार घालण्याचा शेतकऱ्यांच्या पवित्र्यानंतर पालकमंत्र्यांनीही अधिकाऱ्यांना सूचना करून ठेकेदारांना कामे उरकण्याची तंबी दिली. त्यामुळे नीरा-देवघरचे पाणी वाघोशीपर्यंत येण्याचा मार्ग मोकळा झाला.
खंडाळा तालुक्यातील नीरा-देवघर धरणाच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना पिण्यासाठी, शेतीसाठी मोठी पाणीटंचाई जाणवत होती. नीरा-देवघर धरणाच्या कालव्याचे काम पूर्ण करून वाघोशीला मार्चअखेर पाणी प्रवाहित करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिले होते.
मात्र, मोर्वे गावच्या हद्दीतील कालव्याच्या कामांच्या दिरंगाईमुळे पाणी उपलब्ध असतानाही वाघोशी व आसपासच्या गावच्या नागरिकांना व प्रकल्पग्रस्तांना केवळ पाण्याची प्रतीक्षा करण्यापलीकडे काहीही करता येत नव्हते. खंडाळा तालुक्यामध्ये सध्या वाघोशी परिसरात मोठी पाणीटंचाई जाणवू लागली होती. त्यामुळे नीरा-देवघर कालव्याचे वाघोशीपर्यंत पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. चार-पाच दिवस वाघोशी, कराडवाडी, अंदोरी परिसरातील नागरिक या पाण्याची आतुरतेने वाट पाहत होते. तसेच पाण्याला प्रवाहित होण्यासाठी येणारे अडथळे श्रमदान करून दूर करत होते. यामध्ये वाघोशी ग्रामस्थांनी सर्वाधिक श्रमदान व कष्ट केले. तसेच रात्रीचा दिवस करून नीरा-देवघरचे पाणी वाघोशीपर्यंत आणले आहे.

Web Title: After tireless efforts, the niramai broke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.