शिरवळपाठोपाठ सुरुरमध्येही यंत्रणेची धावपळ- ‘लोकमत’चा दणका...
By Admin | Updated: August 9, 2014 00:28 IST2014-08-09T00:10:33+5:302014-08-09T00:28:42+5:30
मुरुमीकरण सुरू : ग्रामस्थांना हवी कायमस्वरूपी दुरुस्ती; जनक्षोभ बळावण्याची चिन्हे

शिरवळपाठोपाठ सुरुरमध्येही यंत्रणेची धावपळ- ‘लोकमत’चा दणका...
सुरूर : महामार्गावर टोल भरूनही चुकवाव्या लागणाऱ्या खड्ड्यांविषयीचे सडेतोड वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच महामार्ग प्राधिकरणाने सुरूरच्या बाजारतळ परिसरात तातडीने मुरुमीकरण करून तात्पुरती डागडुजी सुरू केली आहे. अर्थात, मोठा पाऊस झाल्यावर ही तकलादू मलमपट्टी लगेच उखडणार आहे. त्यामुळे कायमस्वरूपी उपाय योजण्याची मागणी परिसरातून होत आहे.‘लोकमत’च्या वृत्तामुळे किमान मुरूम तरी येऊन पडला आणि आठवडाभर तरी खड्ड्यांपासून मुक्ती मिळाली, अशी प्रतिक्रिया सुरूर ग्रामस्थांनी व्यक्त केली. दरम्यान, टोलनाक्यावरील टोलचा दर दिवसेंदिवस वाढतच असून, सामान्य नागरिकांना त्यातून सवलतही मिळत नाही. वेळप्रसंगी वादावादीला सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत ‘खराब रस्त्यांसाठी टोलचे भूत आमच्या मानगुटीवर का बसविले आहे,’ अशा तिखट प्रतिक्रिया वाहनचालकांतून व्यक्त होत आहेत. दरवर्षी या ठिकाणी रस्ता खराब होतो. मात्र, त्याची कोणीही दखल घेत नाही. घेतलीच तर असे तात्पुरते उपाय योजले जातात. आता कायमस्वरूपीच दुरुस्ती हवी, असा आग्रह ग्रामस्थांनी धरला आहे. (वार्ताहर)