महाड दुर्घटनेनंतर वाठारचा पूल बंद
By Admin | Updated: August 7, 2016 22:57 IST2016-08-07T22:57:29+5:302016-08-07T22:57:29+5:30
ब्रिटिशकालीन बांधकामाला तडे : प्रशासनाला अखेर जाग; कोरेगाव तालुक्यातील पर्यायी मार्गावरुन वाहतूक सुरू

महाड दुर्घटनेनंतर वाठारचा पूल बंद
वाठार स्टेशन : येथील ९० वर्षे जुना ब्रिटिशकालीन पुलाला यापूर्वीच तडे गेले असून, महाड दुर्घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली आहे. हा पूल रविवारपासून वाहतुकीसाठी बंद करण्याचा फलक लावला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त होत आहे.
पोलादपूर-पंढरपूर या मार्गावर वाठार स्टेशनपासून जवळ असलेल्या ब्रिटिशकालीन पुलास तडे गेल्यामुळे हा पूल आता अवजड वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.
प्रमुख व्यापारी केंद्र असलेल्या वाठार स्टेशन हे ब्रिटिश राजवटीत महत्त्वाचे केंद्र होते. ब्रिटिश काळातील महत्त्वाचे रेल्वे स्टेशन आजही मोठ्या दिमाखात या ठिकाणी कार्यरत आहे. याशिवाय वाठार स्टेशनची सध्याची ग्रामपंचायतही ब्रिटिशकालीन एका धर्मशाळेत सुरू आहे. वाठार पोलिस ठाणे, वाठार बसस्थानक या सर्वच इमारती ब्रिटिशकालीन आहेत.
येथूनच ब्रिटिश लोक महाबळेश्वरकडे जात होते. त्यामुळे वाठार, वाई, महाबळेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाठार स्टेशन, वाघोली, ओझर्डे, वाई याठिकाणी ब्रिटिशांनी पुलाचे बांधकाम केले होते.
बहुतांशी पुलांचे आयुर्मान संपले असतानाही हे पूल कार्यरत ठेवण्याचे काम राज्य शासनाकडून सुरू होते. मात्र, महाडनजीक झालेल्या दुर्घटनेने आता सर्वांचेच डोळे उघडले आहेत. सातारा जिल्ह्यातील अनेक पुलांबाबत सध्या सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष ठेवून आहे.
कोरेगाव तालुक्यातील अशा अनेक पुलांचा सात बाराच आता सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केला आहे. वाठार-पिंपोडे बुद्रुकमधील ९० वर्षांचा हा पूल रविवारपासून अवजड वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचा व सावधानतेचा इशारा देत हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.
पंढरपूर-पोलादपूर प्रमुख मार्गावरील हा पूल बंद झाल्यामुळे आता अवजड वाहतुकीसाठी वाठार स्टेशन, वाग्देव चौक, तडवळे संमत वाघोली, पिंपोडे बुद्रुक या नवीन मार्गाने वाहतूक सुरू होणार आहे. वाठार पिंपोडे बुद्रुक हे अंतर चार किलोमीटरचे असून, या मार्गामुळे बारा ते तेरा किलोमीटरने वाढणार आहे. याचा फटका मोठ्या प्रमाणात वाहनधारकांना बसणार आहे.
महाबळेश्वर-वाईकडून वाठार स्टेशनकडे येणाऱ्या वाहनांनाही पिंपोडे बुद्रुककडून तडवळे संमत वाघोली गावातून सातारा-लोणंद राज्यमार्गाकडे यावे लागणार आहे.
याबाबत कोरेगाव सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अहिरे यांनी वाठार स्टेशनजवळील या पुलाची प्रत्यक्ष पाहणी केली. हा पूल अवजड वाहतुकीसाठी बंद केल्याचे पत्रक व फलक सर्वच ठिकाणी लावण्याच्या सूचना केल्या आहेत. त्याप्रमाणे संबंधित धोकादायक पुलास बॅरिकेट लावून रस्त्याकडेच्या अनेक फलकांवर ‘सावधान अवजड वाहतुकीस बंद’ असल्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने इतर पुलांचीही पाहणी करावी, अशी मागणी होत आहे.
आणखी किती पूल धोकादायक
महाडमधील दुर्घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने सातारा जिल्ह्यातील अनेक ब्रिटिशकालीन पुलांपैकी वाठार स्टेशननजीकच्या पुलास ‘रेड सिग्नल’ दाखवला आहे. आता यापुढे किती पुलांच्या बाबतीत बांधकाम विभाग जागरुकता दाखवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वाठार स्टेशन-पिंपोडे बुद्रुक या गावादरम्यानचा नव्वद वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी बांधलेल्या पुलास खालील बाजूने तडे गेले आहेत. हे तडे दहा ते बारा वर्षांपूर्वीचे असून, यापूर्वी एकवेळा या तड्यांचे गळती काढण्याचा प्रयत्न केला होता. परंतु गेल्या एक ते दोन महिन्यांपासून या पुलाच्या तड्यांचा आकार विस्तारत असल्याने हा पूल अवजड वाहतुकीसाठी योग्य नाही, अशी माहिती वरिष्ठांना दिली आहे. लवकरच या पुलाजवळ पर्यायी नवीन पूल बांधण्याचे काम सुरू करण्यात येणार असल्याने अवजड वाहनधारकांनी या पुलाचा वापर करू नये.
- आर. टी. अहिरे,
उपअभियंता सार्वजनिक बांधकाम