नेत्यांनंतर आता पदाधिकारी हमरीतुमरीवर!
By Admin | Updated: December 15, 2015 00:52 IST2015-12-14T20:38:30+5:302015-12-15T00:52:02+5:30
रंगतोय कलगीतुरा : पाटण तालुक्यात देसाई-पाटणकर गटाचा भडक्यामुळे राजकीय वातावरण ढवळले

नेत्यांनंतर आता पदाधिकारी हमरीतुमरीवर!
पाटण : पाटण तालुक्यात सदा सर्वकाळ देसाई आणि पाटणकर या दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय सवाल-जवाब सुरू असतो. हे सर्वज्ञात आहे. याचा पुळका मात्र आता दोन्ही बाजंूकडील पदाधिकाऱ्यांकडून खालच्या पातळीवर आरोप-प्रत्यारोप करण्यापर्यंत मजल गेली आहे. पदाधिकाऱ्यांमधील कलगीतुऱ्यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. ‘नेत्याची भागली आता पदाधिकाऱ्यांची सटकली...’ अशी चर्चा तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक करत आहे.
ढेबेवाडी विभागात काही दिवसांपूर्वी झालेल्या कार्यक्रमात विक्रमसिंह पाटणकर यांना उत्तर देताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले की, ‘सरदार सर्वसामान्य जनतेच्या पंगतीला बसत नाही. मी मात्र, लोकांच्या मांडीला मांडी लावून जेवण करतो.’
यावरून दोन्ही नेत्यांमध्ये मोठी ठिणगी पडली. तर कोयना विभागातील बोपोली गावात झालेल्या रस्ता भूमिपूजनप्रसंगी आमदार शंभूराज देसाई यांनी पाटणकरांवर थेट टीका केली.
या टिकेला उत्तर देताना कोयना विभागातील पंचायत समिती सदस्य आणि उपसभापती राजाभाऊ शेलार यांनी विद्यमान आमदारांवर टीका केली. त्यामुळे संतप्त झालेल्या देसाई गटाने विद्यमान उपसभापती डी. आर. पाटील यांना मैदानात उतरवले.
‘राजाभाऊ शेलार हे पाटणकरांची चमचेगिरी करतात. केवळ पदासाठी नेत्यांच्या मागे लागणारा कार्यकर्ता आहे,’ अशी टीका डी. आर. पाटील यांनी केली.
त्याला उत्तर देताना मुंबईच्या शेठला पाटणमध्ये आणून ‘पैशांच्या जोरावर निवडून आणले.या मुंद्रूळकोळे विभागाच्या सदस्याला चिठ्ठीवर उपसभापती पद मिळाले. आमदार देसाई यांनी चमचेगिरी कशी करावी, हे शिकवू नये’ असे प्रतित्तत्तर राजाभाऊ शेलार यांनी दिले.
या कलगीतुऱ्यामुळे ‘नेत्यांची भागली आता पदाधिकाऱ्यांची सटकली’ याचा प्रत्यय जनतेला येऊ लागला आहे. हा वाद आणखी काही दिवसांत आणखी विकोपाला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (प्रतिनिधी)
भूकंपग्रस्त दाखल्यांसाठी श्रेयवाद
भूकंपग्रस्त दाखल्यांसाठी आमदार देसाई आणि विक्रमसिंह पाटणकर गटांचे बाळासाहेब पवार यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, निकाल लागला आहे. दोन्ही याचिकांवर न्यायालयाने एकच निकाल दिला आहे. यावरून आमदार शंभूराज देसाई अन् विक्रमसिंह पाटणकर या दोन्ही गटांमध्ये श्रेयवाद सुरू झाला आहे.