‘हायवे मेगाब्लॉक’नंतर गतिरोधके उद्ध्वस्त
By Admin | Updated: November 15, 2015 23:53 IST2015-11-15T22:10:09+5:302015-11-15T23:53:29+5:30
दहा किलोमीटरसाठी तीन तास : लिंब-खिंड ते पाचवड अन् शेंद्रे ते नागठाणे मार्गावर पाच तास वाहतुकीचा खोळंबा

‘हायवे मेगाब्लॉक’नंतर गतिरोधके उद्ध्वस्त
भुर्इंज/नागठाणे : पुणे-बेंगलोर महामार्गावर पाचवड ते लिंबखिंडीपर्यंत प्रचंड ट्रॅफिक जाम असल्याने रविवारी दुपारपासून वाहनचालक व प्रवाशांचे बेफाम हाल झाले. केवळ दहा किलोमीटर अंतर पार पाडण्यासाठी वाहनांना तब्बल पाच तास लागले. हीच परिस्थिती शेंद्रे ते नागठाणे दरम्यानही निर्माण झाली.दिवाळीच्या सुट्या संपल्याने महामार्ग शनिवार पासूनचे वाहनांच्या गर्दीने ओसंडून वाहत आहे. या गर्दीचा रविवारी कहर झाला. पाचवड येथे सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहतूक सेवा रस्त्याने वळविण्यात आली आहे. त्यामुळे पाचवड ते थेट गौरीशंकर कॉलेज या दहा किलोमीटर अंतरापर्यंत ट्रॅफिक जाम झाले आणि त्यामुळे वाहन चालकांसह प्रवाशांचे बेफाम हाल झाले. वाहतूक कोंडीमुळे अनेक प्रवासी अक्षरश: रडवेले झाले होते. टोल नाक्यावरील अंदाधुंदी या ट्रॅफिक जाममध्ये भर घालणारी ठरली. फक्त अर्थपूर्ण कारणासाठी टोल नाक्यावर उभे असणारे वाहतूक पोलिसही ट्रॅफिक जाम दूर करताना दिसून आले नाहीत. दिवाळीची सुटी तसेच शनिवारी दुसरा शनिवार व रविवार अशा सलग सुट्या आल्या आहेत. त्यामुळे पर्यटकांची पावले महाबळेश्वर, पाचगणी, कास, बामणोलीच्या दिशेने वळाला लागले आहेत. महामार्गावरील आनेवाडी टोलनाक्यावर वाहनांची गर्दी होत आहे.सलग सुट्या साजऱ्या करण्यासाठी पुणे, मुंबईसह गुजरात राज्यातून मोठ्या संख्येने पर्यटक महाबळेश्वरला येणे पसंत करत असतात. त्यामुळेच महाबळेश्वर पाचगणी मार्गावर शनिवारी वाहनांच्या लांबचलाब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे सुमारे दोन ते तीन तास वाहतुकीची कोंडी झाली होती.आनेवाडी टोलनाक्यावरही शनिवारी व रविवारी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे टोलनाक्यावर लेन वाढविण्याची मागणी वाहनचालकांमधून केली जात आहे. दिवाळीच्या सुट्या संपल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्र.४ वर साताराहून पुणे-मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. उडतारे गावापासून पाचवड फाट्यापर्यंत महामार्गावर वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या. सातारहून पुणे-मुंबईकडे जाणारा मोठा नोकदारवर्ग आहे. दिवाळीच्या सुट्या संपल्यामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला मोठ्या फाट्यांवर ठिकठिकाणी हा नोकरदारवर्ग पुणे-मुंबईकडे प्रवासासाठी थांबल्याने वाहतूक कोंडीत आणखी भर पडताना दिसत होती. सुट्यांमध्ये सातारा-कोल्हापूरकडे येणाऱ्या पर्यटकांचीही संख्या सध्या जास्त असून, हे पर्यटक सध्या परतीच्या मार्गावर आहेत. शनिवारपासून सुरू झालेली वाहतुकीची कोंडी रविवारी सायंकाळपर्यंत वाढत गेली. साताराकडून पुणे-मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागलेल्या होत्या. वाहतुकीच्या कोंडीमुळे काही वाहनचालकांमध्ये वादावादीच्या घटनाही घडल्या. पाचवड फाट्यावरील चौकामध्ये भुर्इंज पोलिसांचा मोठा फौैजफाटा तैणात करण्यात आला असून, रविवारी उशिरापर्यंत वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न पोलिसांमार्फत सुरू होते. (प्रतिनिधी)
पोलीस खाते बनले आक्रमक
लिंबखिंड ते पाचवड दरम्यान सुरु असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे पर्यायी रस्त्यावर जागोजागी ठेकेदाराने गतिरोधक उभे केले आहेत. या गतिरोधकांमुळेच रविवारी सायंकाळपासून वाहतुकीचा खोळंबा होत असल्याचे स्पष्ट झाले. तेव्हा पोलीस खात्यानेच पुढाकार घेऊन ही सर्व गतिरोधके उखडण्याची मोहिम संबंधितांना हाती घ्यायला लावली. जवळपास एक तास जेसीबी यंत्रांनी वीसपेक्षाही जास्त गतिरोधके उद्ध्वस्त करण्यात आली. तरीही रात्री दहापर्यंत वाहतूक सुरळीत होण्याची चिन्हे दिसत नव्हती.