कंबरडं मोडल्यानंतरच होतंय देवाचं दर्शन
By Admin | Updated: January 23, 2015 23:39 IST2015-01-23T20:17:42+5:302015-01-23T23:39:29+5:30
शिखर शिंगणापूर रस्त्याची दुरवस्था : उपाययोजनेची मागणी; यात्रेच्या तोंडावर भाविकांची कुचंबणा

कंबरडं मोडल्यानंतरच होतंय देवाचं दर्शन
पळशी : महाराष्ट्राचे कुलदैवत शिखर शिंगणापूर येथील शिंगणापूर बसस्थानक ते शिखर शिंगणापूर मंदिर या एक किलोमीटर मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत तर विश्रामगृहाजवळील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. बऱ्याच ठिकाणी साईडपट्ट्याही खचलेल्या आहेत. मुळातच हा रस्ता एकेरी असून, ठिकठिकाणी खडी उखडल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. शिखर शिंगणापूर यात्रा अवघ्या अडीच महिन्यांवर येऊन ठेपली आहे, असे असताना याची कोणतीही दखल घेतली नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत.या रस्त्यावरच्या साईडपट्ट्या खराब झाल्याने धोकादायक बनल्या आहेत. त्यामुळे याठिकाणी दोन वाहने समोरासमोर आल्यास वाहन बाजूला घेताना अतिशय अडचणी येत आहेत. रस्त्याकडेलाच विश्रामगृहाजवळच खडीचे ढीग वापराविना तसेच पडून आहेत. मंदिराकडे जाणारा पेठेतील रस्ता नागमोडी असून, ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे वाहनचालक तसेच ग्रामस्थांत नाराजी आहे. येथे महाराष्ट्रासह परराज्यातूनही मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. येणाऱ्या भाविकांना रस्त्यावरून अडचणींचा सामना करतच जावे लागते. यामुळे संबंधित विभागाने या रस्त्याच्या दुरुस्तीची सुरुवात करावी, अशी मागणी होत
आहे. (वार्ताहर)
ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे रस्ता दुरुस्तीबाबत सातत्याने मागणी करूनही अद्यापही रस्त्यातील खड्डे भरून घेतले नाहीत. या रस्त्याचे टेंडर मंजूर होऊनही संबंधित ठेकेदाराने काम केलेले नाही. जिल्हा परिषदेने दुसऱ्या ठेकेदाराला काम द्यावे व यात्रेपूर्वी रस्ता दुरुस्ती करावी.
-राजाराम बोराटे, उपसरपंच, शिखर शिंगणापूर
यात्रा अवघ्या अडीच महिन्यांवर
शिखर शिंगणापूरची यात्रा ३१ मार्चला असून, या दिवशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. यात्राकाळात वाहनांची वर्दळ वाढणार असून, अद्यापही रस्ता दुरुस्ती करण्यात आलेली नाही.
तीर्थक्षेत्र म्हणून श्रीक्षेत्र शिखर शिंगणापूरची सर्वदूर ओळख आहे. राज्यातील इतर देवस्थानांच्या मानाने इथला विकास खुंटलेलाच आहे. येथे येणाऱ्या लाखो भाविकांना रस्त्यांच्या गैरसोयीमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
- दीपकराव तंटे-बडवे
ग्रामस्थ, शिखर शिंगणापूर
बसस्थानक ते मंदिर रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी. रस्त्याच्या दुरवस्थामुळे भाविक हैराण झाले आहेत. संबंधित विभागाने यात्रेपूर्वी दुरुस्ती करावी. यात्रा अवघ्या अडीच महिन्यांवर आली तरी प्रशासनाचे अद्याप दुर्लक्ष आहे.
-संपत शेंडे,
ग्रामस्थ, शिखर शिंगणापूर