आदिवासींना समजावून घेतल्याने बदल प्रकाश आमटे : फलटण येथे मालोजीराजे ‘स्मृती पुरस्कार’ प्रदान
By Admin | Updated: May 15, 2014 23:30 IST2014-05-15T23:28:34+5:302014-05-15T23:30:01+5:30
फलटण : नक्षलवाद्यांचा जिल्हा म्हणून गडचिरोलीची वेगळी प्रतिमा निर्माण झाली असली तरी गेली सुमारे ६५ वर्षे या जिल्ह्यातील जंगलात वास्तव्य करुन

आदिवासींना समजावून घेतल्याने बदल प्रकाश आमटे : फलटण येथे मालोजीराजे ‘स्मृती पुरस्कार’ प्रदान
फलटण : नक्षलवाद्यांचा जिल्हा म्हणून गडचिरोलीची वेगळी प्रतिमा निर्माण झाली असली तरी गेली सुमारे ६५ वर्षे या जिल्ह्यातील जंगलात वास्तव्य करुन अदिवासींना समजावून घेवून केलेली मदत व मार्गदर्शनामुळे या जिल्ह्यात सकारात्मक वातावरण निर्माण होत आहे. देशाच्या विविध भागातून येणारे डॉक्टर्स तेथे सेवावृत्तीने काम करीत आहेत, असे प्रतिपादन पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांनी केले. येथील श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँकेच्या वतीने श्रीमंत मालोजीराजे स्मृती महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांना ‘श्रीमंत मालोजीराजे स्मृती’ पुरस्काराने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष रामराजे नाईक निंंबाळकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. २१ हजार रुपये रोख, सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पहार असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्कार वितरणानंतर उपस्थित फलटणकरांनी व्यक्तीगतरित्या आणि संस्था, संघटनांच्यावतीने डॉ. आमटे दाम्पत्याच्या समाजसेवी कामासाठी उत्स्फूर्तपणे देणग्यांचे धनादेश त्यांच्याकडे स्वत:हून सुपूर्द केले. फलटणकरांच्यावतीने या कामासाठी लक्षावधी रुपये उपलब्ध करुन दिल्याने आमटे दाम्पत्य भारावून गेले. विदर्भात जमिनदार आणि शिकारी असलेले बाबा आमटे यांनी आनंदवन संस्थेच्या माध्यमातून कुष्टरोग्यांसाठी काम केले. त्यानंतर १९४६ मध्ये स्वत:ची सारी संपत्ती, बंगला, गाडी सोडून बाबा हे वरोरा जंगलात कुटुंबासह वास्तव्यास आले. त्यामुळे आम्हा दोघा भावांच्या शिक्षणाविषयी अस्थिरता वाटत होती. तथापी आम्ही उच्चशिक्षण घेतले, आपण एमबीबीएस पदवी घेतली. मात्र गरजा कमी करुन जंगलातील वास्तव्यात असलेल्या आनंदाने आपल्याला इतरत्र जाण्यास एकप्रकारे मज्जाव केला. तेव्हापासून गेली सुमारे ३६ वर्षे आम्ही दोघे आदिवासींना वैद्यकीय सेवा देण्याबरोबर त्यांच्यात राहण्यात आनंद मानत राहिलो. परिणामी आमच्याविषयी आदिवासींमध्ये विश्वास व आपुलकीचे नाते निर्माण झाले. तसेच नाते आम्ही इथल्या पशूपक्षांशी निर्माण केल्याने येथून अन्यत्र जाण्याचा विचारही मनात येत नाही. तीच भावना आमच्या मुलांची झाली असून त्यांनीही या कामात स्वत:ला झोकून दिल्याचे डॉ. प्रकाश आमटे यांनी स्पष्ट केले. जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष संजीवराजे नाईक-निंंबाळकर यांनी स्वागत व प्रास्तविक केले. प्रा. दीक्षित व प्रा. निलम देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. बँकेचे व्यवस्थापक नगरकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)