कर्मचारी संपावर गेल्याने मुख्याध्याधिकाऱ्यांनी केले अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:28 IST2021-06-05T04:28:26+5:302021-06-05T04:28:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोरेगाव : कोरेगावात शुक्रवारी नगरपंचायत कर्मचारी संपावर गेले होते. त्यांच्याशी चर्चा सुरू असतानाच, शहरातील एक वयस्कर ...

कर्मचारी संपावर गेल्याने मुख्याध्याधिकाऱ्यांनी केले अंत्यसंस्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरेगाव : कोरेगावात शुक्रवारी नगरपंचायत कर्मचारी संपावर गेले होते. त्यांच्याशी चर्चा सुरू असतानाच, शहरातील एक वयस्कर महिला कोरोनाने मृत्यू पावल्याची बातमी समजली. क्षणातच बैठक गुंडाळून पदाधिकारी, नगरसेवक आणि मुख्याधिकाऱ्यांनी स्वत: अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. सर्वांनी शासकीय नियमांचे पालन करत पीपीई किटचा वापर करून अंत्यसंस्कार केले.
नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी रात्री अचानक संपावर जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सकाळपासून कोरोना हॉस्पिटल्ससह स्मशानभूमीमध्ये काम करण्यास कोणीही नव्हते. नगरपंचायत कार्यालयात संपावर तोडगा काढण्याची बैठक सुरू होती. कोणत्याही मार्गाने संप मिटवण्याबाबत चर्चा सुरू असतानाच, सुभाषनगर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते नगरपंचायत कार्यालयात दाखल झाले. त्यांनी परिसरातील एका वृध्द महिलेचा कोरोनाने मृत्यू झाल्याची माहिती दिली.
कर्मचारी संपावर असल्याने अंत्यसंस्काराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. तेवढ्यात किरण बर्गे, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, नगरसेवक महेश बर्गे, सुनील बर्गे व मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी आपण स्वत: अंत्यसंस्कार करू या, अशी भूमिका घेतली. त्यांनी तातडीने स्मशानभूमीकडे जाण्याचा निर्णय घेतला. आम्हीसुध्दा तुमच्याबरोबर येतो, असे म्हणत नगराध्यक्षा रेश्मा कोकरे व उपनगराध्यक्षा मंदा बर्गे यादेखील स्मशानभूमीकडे रवाना झाल्या. शासकीय नियमांचे पालन करत सर्वांनी पीपीई किट धारण केले आणि कोरोनाबाधित महिलेवर अंत्यसंस्कार केले.
कर्मचाऱ्यांच्या कार्यास सलाम
कोरेगाव तालुक्यातील सुमारे ११६ गावांतील कोरोनाबाधित मृतांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी नगरपंचायतीकडे सोपविण्यात आली आहे. गेली दीड वर्षे नगरपंचायतीचे कर्मचारी ही जबाबदारी अहोरात्र पार पाडत आहेत. न्याय मागण्यांसाठी ते संपावर गेल्याने आम्ही पुढाकार घेऊन अंत्यसंस्काराची जबाबदारी घेतली. मात्र एक ते दीड तास पीपीई किट घालून काम करणे किती अवघड आहे, याची जाणीव झाली. खरंच आमच्या कर्मचाऱ्यांच्या कामावर आम्हाला अभिमान आहे, त्यांच्या कार्यास सलाम करतो, अशी प्रतिक्रिया नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
फोटोनेम : कोरेगाव अंत्यसंस्कार. जेपीजी.
कोरेगाव नगरपंचायतीचे कर्मचारी शुक्रवारी संपावर होते. त्यामुळे कैलास स्मशानभूमीत कोरोनाबाधित वृध्द महिलेवर किरण बर्गे, राजाभाऊ बर्गे, सुनील बर्गे, महेश बर्गे, संतोष कोकरे, किशोर बर्गे यांनी अंत्यसंस्कार केले.
फोटो ओळ : कोरेगावातील कैलास स्मशानभूमीत कोरोनाबाधित वृध्द महिलेवर अंत्यसंस्कारप्रसंगी किरण बर्गे, राजाभाऊ बर्गे, सुनील बर्गे, महेश बर्गे, संतोष कोकरे, किशोर बर्गे.