घरपट्टी बिलावर आता जाहिराती

By Admin | Updated: May 15, 2015 23:35 IST2015-05-15T21:59:46+5:302015-05-15T23:35:21+5:30

उत्पन्नात होणार वाढ : सातारा पालिकेचा राज्यातील पहिलाच उपक्रम

Advertisement now on the property bill | घरपट्टी बिलावर आता जाहिराती

घरपट्टी बिलावर आता जाहिराती

सातारा : सध्याच्या जमान्यामध्ये जाहिरातीला अन्यनमहत्त्व प्राप्त झाले आहे. कोणत्याही वस्तूची जाहिरात केल्याशिवाय त्या वस्तूची विक्री अथवा प्रसिद्धी होत नाही, हे सर्वश्रूतच आहे. जाहिरातीच्या माध्यमातून आर्थिक उलाढाल मोठी होत असल्याने खासगी संस्थांबरोबरच आता शासकीय विभागही जाहिरातीतून वार्षिक उत्पन्न कसे वाढेल, हे पाहात आहेत. सातारा पालिकेनेही आता जाहिरातीच्या माध्यमातून तिजोरीमध्ये भर टाकण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. घरपट्टी बिलावर आता जाहिरात छापल्याने पालिकेच्या उत्पन्नात वर्षाला तब्बल पाच लाखांची वाढ होणार असून, हा उपक्रम बहुदा राज्यातील पहिलाच आहे.
पालिकेला अनेक मार्गाने कर वसूल होत असतो; परंतु वाढत्या शहरीकरणामुळे हा कररूपी निधीही विकासकामांसाठी कमी पडत असतो. निधी मिळाला नाही तर नागरिकांची कामेही रखडत असतात. त्यामुळे पालिकेचे उत्पन्न कसे वाढेल, यासाठी नवनव्या योजना अंमलात आणल्या जातात. सध्या जाहिरात हे एक मोठे उत्पन्नाचे साधन आहे. सर्वच क्षेत्रात जाहिरातीने शिरकाव केला आहे. नव्या युगाची चाहूल ओळखून स्थानिक स्वराज्य संस्थाही आता मागे राहिल्या नाहीत. त्याचाच एक भाग म्हणून सातारा पालिकेने जाहिरातीच्या माध्यमातून पालिकेला आणखी आर्थिक हातभार कसा लागेल, या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पालिकेचे मिळकतदार लाखो जण आहेत. त्यामुळे एखाद्याने जाहिरात दिली तर त्यांना त्या मिळकतधारकांपर्यंत पोहोचण्यास वेळ लागणार नाही. सध्या घरपट्टीची बिले घरोघरी दिली जातात. हाच धागा पकडून पालिकेने घरपट्टी बिलावर जाहिरात घेऊन ती छापण्यास सुरुवात केली आहे. जाहिरातीचे जेमतेम दर ठेवून व्यावसायिकांना आकर्षित करून घेतले आहे. पालिकेच्या या उपक्रमाला व्यावसायिकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे भविष्यात उत्पन्नाचा स्रोत म्हणून पालिकेला हे अत्यंत महत्त्वाचे साधन उपलब्ध झाले आहे. नगरसेवक प्रवीण पाटील यांना या उपक्रमाची कल्पना सूचल्यानंतर त्यांनी मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्यासमोर हा विषय मांडला. त्यानंतर लगेच या उपक्रमाला सुरुवातही झाली. (प्रतिनिधी)


मिळकतधारकांना बिलाचे वाटप
घरपट्टी बिलावर जाहिरात छापून पालिकेने उत्पन्न वाढीसाठी हाती घेतलेल्या उपक्रमाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कौतुक केले. शुक्रवारी दुपारी पालिकेत झालेल्या छोटेखानी कार्यक्रमामध्ये शिवेंद्रसिंहराजेंंच्या हस्ते काही मोजक्याच मिळकतधारकांना घरपट्टी बिलाचे वाटप करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष सचिन सारस, उपनगराध्यक्षा दीपाली गोडसे, मुख्याधिकारी अभिजित बापट आदी उपस्थित होते.

Web Title: Advertisement now on the property bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.