साहसी संस्थांची होणार नोंदणी
By Admin | Updated: August 3, 2014 22:45 IST2014-08-03T21:39:02+5:302014-08-03T22:45:05+5:30
उदय जोशी : साताऱ्यातील साहसवीरांना केले आवाहन

साहसी संस्थांची होणार नोंदणी
सातारा : जिल्ह्यातील साहसी प्रकारातील कार्य करणाऱ्या संस्थांची नोंदणी आता जिल्हा स्तरावर होणार आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या अध्यक्षेतखाली यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीवर पुणे येथील क्रीडा व युवक सेवा आयुक्त कार्यालयाचे नियंत्रण राहणार आहे.
ज्या संस्था साहसी मोहीम आयोजित करतात त्या संस्था पुरेशी वैद्यकीय साधन सामुग्री, सुरक्षिततेच्या उपाययोजना आदी बाबींकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार एका जनहित याचिकेच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली होती. त्यानुसार राज्य शासनाला साहसी उपक्रमाबाबतचे धोरण व मार्गदर्शन सुचना करण्याचे आदेश देण्यात आले होते. परिणामी जिल्ह्यातील साहसी प्रकारातील कार्य करणाऱ्या सर्व संस्थांची नोंदणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी उदय जोशी यांनी दिली.
जिल्ह्यात कार्य करणाऱ्या साहसी क्रीडा प्रकारात जमिनीवरील, हवाई व जलक्रीडा प्रकारातील कार्य करणाऱ्या संस्थांची नोंदणी करण्यासाठी विहीत नमून्यातील अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जिल्हास्तरावर साहसी उपक्रमासाठी मान्यता दिलेल्या संस्थांना नंतर जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. दरम्यान, साहसी क्रीडा प्रकारात कार्य करणाऱ्या संस्थांनी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी उदय जोशी यांनी केले आहे. (प्रतिनिधी)