हात-पाय पसरणाऱ्या कोरोनाविरोधात प्रशासनाची मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:40 IST2021-04-01T04:40:00+5:302021-04-01T04:40:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोना महामारीने पुन्हा हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. जिल्हा प्रशासनाने ही महामारी रोखून धरण्यासाठी ...

हात-पाय पसरणाऱ्या कोरोनाविरोधात प्रशासनाची मोहीम
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोरोना महामारीने पुन्हा हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. जिल्हा प्रशासनाने ही महामारी रोखून धरण्यासाठी पुन्हा नव्याने रणनिती आखली आहे. कोरोना संशयित रुग्णांच्या हातावर होम क्वाॅरंटाईनचे शिक्के मारण्यात येत असून, अशा व्यक्ती जर घराबाहेर फिरताना आढळल्या तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे.
जिल्ह्यात या बाबींना मनाई
१) सातारा जिल्ह्यात रात्री ८ वाजल्यापासून ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याचवेळी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक व अत्यावश्यक सेवा सुरु राहतील.
२) नववीपर्यंतचे सर्व वर्ग (निवासी शाळा वगळून), प्रशिक्षण संस्था, कोचिंग इन्स्टिट्यूट, कॉम्प्युटर व टायपिंग इन्स्टिट्यूट बंद राहतील.
३) सर्व सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक कार्यक्रम (यात्रा/जत्रा इत्यादी) तसेच मोठया संख्येने लोक जमा होणारे कार्यक्रम, परिषदा तसेच सभा मंडप, मोकळ्या जागेत होणारे इतर कार्यक्रम बंद राहतील. याबाबत उल्लंघन झाल्यास शासनाचे दिनांक १५ मार्च व १७ मार्च २०२१चे आदेशातील तरतुदीनुसार जोपर्यंत केंद्र शासनाचे आपत्ती व्यवस्थापनाकडून कोविड - १९ साथीचा रोग आटोक्यात आल्याचे जाहीर होत नाही, तोपर्यंत संबंधित मालमत्ता बंद राहतील.
४) सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, तंबाखू इत्यादी सेवन करण्यास मनाई करण्यात आली आहे.
५) पाचपेक्षा जास्त व्यक्तिंना रात्रीचे ८ वाजल्यापासून ते सकाळी ७ वाजेपर्यंत एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.
जिल्ह्यात या बाबींना परवानगी मात्र बंधन कायम
१) मॉल, हॉटेल, फुड कोर्ट्स, रेस्टॉरंट्स आणि बार यांना ५० टक्केपेक्षा जास्त नाही, इतक्या क्षमतेने सकाळी ७ ते रात्री ८ या कालावधीतच चालू ठेवण्यास परवानगी दिली आहे.
२) कन्टेनमेंट झोनबाहेरील क्षेत्रात सिनेमा हॉल/थिएटर/मल्टिप्लेक्स/ नाटक थिएटर हे आसनाच्या ५० टक्के क्षमतेने सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत चालू राहील.
४) सातारा जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्रामध्ये कोणतेही कार्यक्रम आयोजित करण्यास मनाई आहे. तथापि, प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर परिसरात ५० लोकांच्या (संपूर्ण कार्यक्रमासाठी भटजी, वाजंत्री, स्वयंपाकी/वाढपी इ.सह) मर्यादेत लग्नाशी संबंधित मेळावे/समारंभाचे आयोजन करण्यापूर्वी संबंधित तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक राहील.
५) उत्पादन क्षेत्र पूर्ण क्षमतेने कार्यरत राहू शकेल. तथापि, संबंधित आस्थापना यांनी मास्कशिवाय तसेच थर्मल स्क्रिनींगशिवाय प्रवेश न देणे, सॅनिटायझरचा वापर बंधनकारक आहे.
...असा होईल दंड
१) सार्वजनिक ठिकाणी, घराबाहेर व घरामध्ये जेथे लोकांचा वावर आहे, तेथे असताना तोंडावर व नाकावर मास्कचा वापर न करणाऱ्या व्यक्तिंना ५०० रुपये दंड आकारावा.
२) सातारा जिल्ह्यातील कोणत्याही सार्वजनिक अथवा ज्याठिकाणी लोकांचा वावर जास्त प्रमाणात आहे, अशा खासगी जागेच्या ठिकाणी थुंकण्यास मनाई असून, थुंकल्यास एक हजार रुपये दंड आकारावा.
३) दुकानामध्ये प्रत्येक ग्राहकामध्ये किमान ६ फुटाचे अंतर तसेच दुकानामध्ये एकावेळी ५पेक्षा जास्त व्यक्तिंना घेण्यास मनाई करणेत येत आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास ग्रामीण भागासाठी दोन हजार रुपये व शहरी भागासाठी तीन हजार रुपये दंड आकारावा. तसेच ७ दिवसांपर्यंत दुकान सक्तीने बंद करावे. या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी स्थानिक स्वराज्य संस्थांनी करावी.
४) पाचपेक्षा जास्त व्यक्ती रात्रीचे ८ वाजल्यापासून ते सकाळी ७ वाजेपर्यंत एकत्र आल्यास त्यांना प्रत्येकी एक हजार रुपये दंड आकारावा.
५) बाग, उद्याने आणि करमणुकीच्या उद्देशाने सार्वजनिक मोकळ्या जागा रात्री ८ ते सकाळी ७ यावेळेत बंद राहतील. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर प्रत्येकी एक हजार रुपये दंड आकारावा.
६) सार्वजनिक वाहतूक काही निर्बंधांसह सुरु करण्यात आली आहे. या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्याला ५०० रुपये दंड आकारण्यात येईल. या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी उपप्रादेशिक परिवहन विभागाने करावी.
गृह अलगीकरणात असलेले नागरिक/रुग्णांविषयीची माहिती संबंधित स्थानिक प्राधिकरण यांना कळविणे तसेच गृह अलगीकरणातील व्यक्ती ही कोणत्या वैद्यकीय व्यावसायिकाच्या (डॉक्टर) देखरेखीखाली आहे, याचीदेखील माहिती स्थानिक प्रशासनाला देणे बंधनकारक आहे.
- शेखर सिंह, जिल्हाधिकारी