आंदोलनकर्त्यांच्या प्रश्नाला प्रशासनाकडून हरताळ ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:08 IST2021-02-05T09:08:49+5:302021-02-05T09:08:49+5:30

खंडाळा : खंडाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील परिसरात असणाऱ्या कंपन्यांमध्ये स्थानिक बेरोजगारांना व व्यावसायिकांना प्राधान्य दिले जात नाही. यासंदर्भात स्थानिक ...

Administration strikes over protesters' question ... | आंदोलनकर्त्यांच्या प्रश्नाला प्रशासनाकडून हरताळ ...

आंदोलनकर्त्यांच्या प्रश्नाला प्रशासनाकडून हरताळ ...

खंडाळा : खंडाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील परिसरात असणाऱ्या कंपन्यांमध्ये स्थानिक बेरोजगारांना व व्यावसायिकांना प्राधान्य दिले जात नाही. यासंदर्भात स्थानिक तरुणांनी आंदोलन छेडले होते. याबाबतीत जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीस आंदोलनकर्त्यांना डावलल्याने हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

याबाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, तालुक्यातील औद्योगिक वसाहतीत असलेल्या कंपन्यांमध्ये तालुक्यातील तरुणांचे आधारकार्ड पाहून त्यांना नोकरी नाकारली जाते. अनेक कंपन्यांमधून कोणतीही सूचना न देता स्थानिकांना कामावरून काढण्यात आले आहे. त्याजागी परजिल्ह्यांतील तरुणांना कामे दिली जातात. स्थानिक तरुणांच्या हाताला काम नसल्याने वाढत असलेल्या बेरोजगारांच्या विषयासंदर्भात काही तरुणांनी चड्डी-बनियान आंदोलन केले होते. त्यासाठी ११ जानेवारीला शिरवळ ते सातारा असे चड्डी-बनियानवर सुमारे ६० किलोमीटर अंतर चालत जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना आंदोलनकर्त्यांच्यावतीने या समस्येबाबत निवेदन दिले होते. यावेळी आंदोलनकर्ते इम्रान काझी, अजिंक्य कांबळे यांच्यासह अन्य आंदोलनकर्त्यांना याबाबत २७ जानेवारी रोजी तालुका पातळीवर एक बैठक लावून हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, याविषयासंदर्भात तहसीलदार खंडाळा यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयात काही मोजक्या कंपन्यांची बैठक परस्पर घेण्यात आली. या बैठकीस आंदोलनकर्त्यांना बोलावण्यात आले नव्हते. त्यामुळे या प्रश्नांवर किती चर्चा झाली. याबाबत साशंकता आहे. केवळ वीस मिनिटांची चहापान बैठक झाल्याचे दिसून येते. स्थानिक भूमिपुत्रांच्या प्रश्नाला हरताळ फासण्याचा व आंदोलनकर्त्यांची फसवणूक करण्याचा तहसीलदारांनी प्रयत्न केला आहे. मात्र, या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आम्ही मागे हटणार नाही. याबाबतीत जिल्हाधिकारी यांच्याकडे पुन्हा दाद मागणार असून उलट हे आंदोलन अधिक तीव्र करणार आहोत. याबाबत पुढील काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संबंधित प्रशासन त्याला जबाबदार राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे .

Web Title: Administration strikes over protesters' question ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.