म्हसवड : म्हसवड येथे आम्ही म्हसवडकर ग्रुपच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरला बुधवारी जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी भेट देत म्हसवडकर ग्रुपच्या कामाचे कौतुक केले. कोविडच्या तिसऱ्या लाटेसाठी प्रशासन सज्ज असून, तुम्हीही सज्ज राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी, तहसीलदार बी. एस. माने, उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश सूर्यवंशी, अनिल देसाई, नगराध्यक्ष तुषार विरकर, वैद्यकीय अधिकारी सुरज काकडे, डॉ. राजेंद्र मोडासे, डॉ. मयूरी शेळके आदींची उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कोविड सेंटरची पाहणी करून या केंद्राला कोणतीही अडचण येऊ नये, याची खबरदारी घेण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. तसेच येथील आश्रमशाळेतील तिसऱ्या इमारतीचीही त्यांनी पाहणी केली.
यापुढे प्रशासनाने कर्तव्यदक्ष राहून यापुढील काळात लग्न समारंभ प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांतच व्हावेत, कोणी नियम डावलून समारंभ केल्यास कडक कारवाई करावी, बाहेरून येणाऱ्या लोकांना चौदा दिवस आयसोलेशनमध्ये ठेवावे, यासाठी मोहल्ला कमिटी स्थापन करून बाहेरून येणाऱ्यांवर कमिटीने लक्ष ठेवावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
(चौकट)
जम्बो कोविड सेंटर व्हावे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माण तालुक्यात जम्बो कोविड सेंटर करण्याचे जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी महसवड येथील कोविड सेंटरला भेट दिली असता जम्बो कोविड सेंटर म्हसवडला व्हावे, अशी मागणी येथील पत्रकारांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.