तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:42 IST2021-08-27T04:42:28+5:302021-08-27T04:42:28+5:30
फलटण : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या असून, तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन सज्ज ...

तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन सज्ज
फलटण : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या असून, तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी दिली.
फलटण येथे कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी शासकीय व खासगी रुग्णालये आणि विलगीकरण कक्ष असे एकूण ६३८ सर्व प्रकारचे बेड उपलब्ध असून, त्यापैकी १८० बेडवर रुग्ण उपचार घेत आहेत. उर्वरित ४५८ बेड रिक्त आहेत. दरम्यान, संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन प्रियदर्शनी श्रीमती इंदिरा गांधी सांस्कृतिक भवन विस्तारित इमारतीमध्ये २०० बेडचे जम्बो कोविड केअर सेंटर आणि विद्यार्थिनी वसतिगृहाच्या जुन्या इमारतीमध्ये लहान मुलांसाठी ५० बेडचे कोरोना केअर सेंटर उभारण्यात येत असल्याचे डॉ. शिवाजीराव जगताप यांनी सांगितले.
फलटण शहरात शासकीय व खासगी रुग्णालयात एकूण १४ व्हेंटिलेटर सुविधेचे बेड असून, त्यापैकी २ बेडवर रुग्ण उपचार घेत असून, १२ बेड रिक्त आहेत. आयसीयूमध्ये ८५ बेड उपलब्ध असून, त्यापैकी ६ बेडवर रुग्ण उपचार घेत असून, ७९ बेड रिक्त आहेत. ऑक्सिजन सुविधेचे २२५ बेड उपलब्ध असून, त्यापैकी ४२ बेडवर रुग्ण उपचार घेत असून, उर्वरित १८३ बेड रिक्त आहेत. जनरल ३१२ बेड उपलब्ध असून, त्यापैकी १२६ बेडवर रुग्ण उपचार घेत असून, १८६ बेड रिक्त असल्याचे डॉ. शिवाजीराव जगताप यांनी स्पष्ट केले आहे.