अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी धोत्रे यांची बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:41 IST2021-09-03T04:41:13+5:302021-09-03T04:41:13+5:30
सातारा : जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांची बदली सोलापूरला झाली आहे. तर ग्रामपंचायतीच्या उपमुख्य कार्यकारी ...

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी धोत्रे यांची बदली
सातारा : जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांची बदली सोलापूरला झाली आहे. तर ग्रामपंचायतीच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी अर्चना वाघमळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेतील काही अधिकाऱ्यांची बदली नुकतीच झाली आहे. तर नवीन काही अधिकारी नियुक्त झाले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने बुधवारी आणखी एक आदेश काढून सातारा जिल्हा परिषदेतील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांची बदली केली आहे. धोत्रे यांची सोलापूर जिल्हा परिषदेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीपदीच नियुक्ती झाली आहे. मागील तीन वर्षांपासून धोत्रे हे साताऱ्यात कार्यरत होते.
ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांची बदली बीड येथे झाली आहे. १५ दिवसांपूर्वीच त्यांचा बदली आदेश निघाला होता. पण, त्यांच्या जागी त्यावेळी कोणाची नियुक्ती केली नव्हती. आता फडतरे यांच्या जागी अर्चना वाघमळे यांची नियुक्ती झाली आहे. वाघमळे या रत्नागिरी जिल्हा परिषदेत सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होत्या.
चाैकट :
जिल्हा परिषदेत आता चार महिला अधिकारी...
सातारा जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच चार महिला अधिकारी असणार आहेत. प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी म्हणून प्रभावती कोळेकर कार्यरत आहेत. तर काही महिन्यांपूर्वी जिल्हा समाजकल्याण अधिकारी म्हणून सपना घोळवे या रुजू झाल्या. तर १५ दिवसांपूर्वी महिला व बालकल्याणच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रोहिणी ढवळे यांनी पदभार घेतला. आता अर्चना वाघमळे यांची ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.
.....................................................