Actor Sayaji Shinde tree plantation programme in Satara for martyr soldiers | "५ कोटींच्या बंगल्यात राहणाऱ्या माणसापेक्षा शेतकरी जास्त सुखी"; अभिनेते सयाजी शिंदेंचा नवा उपक्रम

"५ कोटींच्या बंगल्यात राहणाऱ्या माणसापेक्षा शेतकरी जास्त सुखी"; अभिनेते सयाजी शिंदेंचा नवा उपक्रम

सातारा – आपली ताकद ही स्वच्छ हवेत आहे, आपल्या इथं पूर्वी किती प्रमाणात झाडे होती, आता तेच आपल्याला परत लावायचं आहे असं सांगत प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी सह्याद्री देवराईच्या माध्यमातून जय जवान जय किसान ही नवीन संकल्पना राबवली आहे. यात साताऱ्यातील प्रत्येक शहीद जवानाच्या नावाने झाड लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

यावेळी शेतकऱ्यांशी बोलताना सयाजी शिंदे म्हणाले की, जिथं शेतकरी आहे त्याच्या एवढा ताकदवान कोणी नाही, शेतकऱ्यांची ताकद अजून शेतकऱ्यांना कळत नाही, ५ कोटींच्या बंगल्यात राहणाऱ्या माणसापेक्षा शेतकरी जास्त सुखी आहे. दहा कोटींचा बंगला घेण्यापेक्षा झाड होऊन माळरानावर सावली घ्या. आपल्याला सैनिकांच्या सन्मानासाठी झाडे लावायची आहेत, प्रत्येक लहान झाडाची लहान बाळाप्रमाणे काळजी घ्या असं त्यांनी सांगितले.

तसेच गावात लय राजकारणी, लय पक्ष, मारामाऱ्या, दोन भाव वेगवेगळ्या पक्षाचे असतात यातून बाहेर पडत तुम्ही गावकऱ्यांनी सैनिकांच्या नावे झाडं लावण्याचा ठराव केला तो कौतुकास्पद आहे. मला नेहमी येता येणार नाही, पण वर्षातून एकदा मी येईन तेव्हा सगळ्यांचे वाढदिवस एकत्र साजरे करुया असं आवाहन करत आकाशाला गवसणी घालण्यासाठी पक्षाप्रमाणे वागावं लागतं असं सयाजी शिंदेंनी सांगितले. आज वडगाव दडसवाडा याठिकाणी शहीद जवानांचे कुटुंब आणि ग्रामस्थांनी माळरानावर वृक्ष लागवडीचा शुभारंभ केला. त्यात जांभूळ, चिंच, आवळा यासारखी १ हजार ५०० झाडे लावण्याचा संकल्प अभिनेते सयाजी शिंदे आणि ग्रामस्थांनी केला.

सयाजी शिंदे यांचे वृक्षप्रेम सर्वश्रूत आहे. यापूर्वीही त्यांनी वृक्ष लागवडीबाबत अनेक उपक्रम घेतले आहेत. झाडांचे वाढदिवस साजरे व्हायला हवेत व प्रत्येक गाव, तालुक्यातील सर्वात जुनी झाडे हेच त्या त्या भागातील आपले सेलिब्रेटी आहेत, आईनंतर वृक्ष आपल्याला ऑक्सिजन देऊन जगवतात, त्यामुळे आपण सर्वांनी प्रत्येकी पाच झाडे तरी लावून वाढवली पाहिजेत. प्रत्येक शाळेत, संस्थेत वृक्ष बँक सुरू व्हावी. शाळा, कॉलेजच्या अभ्यासक्रमात पर्यावरण विषयाला महत्त्व आले पाहिजे. झाडांचे वाढदिवस साजरे व्हायला हवेत. गेली दोनशे, तीनशे वर्षे आपल्या अनेक पिढ्यांना ऑक्सिजन देणाऱ्या झाडांचे आपण ऋणी राहिले पाहिजे. धोरणकर्त्यांनी आता पर्यावरणाची हानी न करणारी धोरणे आखली पाहिजेत. विचार सगळे कपाटात बंद आहेत. आता प्रत्येकाने कृती करण्यास सुरुवात करायला हवी अशाप्रकारे आवाहन सयाजी शिंदे यांनी लोकांना केले आहे.

Web Title: Actor Sayaji Shinde tree plantation programme in Satara for martyr soldiers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.