चांदकप्रकरणी मंत्रालयातून कारवाई होणार
By Admin | Updated: May 9, 2016 01:07 IST2016-05-08T22:17:27+5:302016-05-09T01:07:14+5:30
कागदोपत्री शेततळं : सहकारमंत्र्यांनाही बसला आश्चर्याचा धक्का..

चांदकप्रकरणी मंत्रालयातून कारवाई होणार
भुर्इंज : ‘चांदक, ता. वाई येथील शेततळे प्रकरणातील गैरप्रकार संतापजनक आहे. या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली असून, नजरेस आलेल्या बाबी धक्कादायक आहेत. याबाबत राज्याचे बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा झाली असून, त्यांनी या प्रकरणात आता लक्ष घातले आहे,’ अशी माहिती भाजपाचे नेते पुरुषोत्तम जाधव यांनी दिली.
‘कृषी विभागाचा चांदक येथील प्रकार म्हणजे ‘आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय,’ असा आहे. केवळ हा प्रकार उघडकीस आला म्हणून दिवसाढवळ्या संबंधित जागेवर शेततळे काढण्यात आले आहे. या सर्व प्रकारात मोठी साखळी असून, खोटी कागदपत्रे सादर करणारी व्यक्ती, संबंधित व्यक्तीच्या गट नंबरमध्ये फक्त कागदावर शेततळे रंगवणारे अधिकारी या सर्वांचीच चौकशी करण्याची मागणी आपण केली आहे. ऐन दुष्काळात सुरू असलेल्या या गैरकारभाराबाबत आता थेट मंत्रालयातूनच कारवाई होणार आहे,’ असेही पुरुषोत्तम जाधव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
नंतर तळे खोदले तरी गैरकृत्य ते गैरकृत्यच!
मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर हे सर्व प्रकरण मांडल्यानंतर त्यांनाही हा अजब कारभार ऐकून धक्का बसला. ज्या शेतकऱ्याच्या नावावर शेततळे मंजूर करण्यात आले आहे, त्याच शेतकऱ्याच्या शेतात ते खोदणे आवश्यक आहे. मात्र तसे न करता निधी खर्च दाखविला. मात्र प्रकरण उजेडात आल्यानंतर शेततळे खोदून कोणी सारवासारवी करत असेल तर गैरकृत्य सत्यकृत्यात बदलत नाही, असेही जाधव यांनी सांगितले.