गणेशोत्सवात नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:46 IST2021-09-07T04:46:17+5:302021-09-07T04:46:17+5:30
कातरखटाव : ‘कातरखटाव व परिसरातील सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या गणेशोत्सव मंडळांनी नियमांचे पालन करून उत्सव साजरा करावा,’ असे ...

गणेशोत्सवात नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई
कातरखटाव : ‘कातरखटाव व परिसरातील सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या गणेशोत्सव मंडळांनी नियमांचे पालन करून उत्सव साजरा करावा,’ असे आवाहन वडूज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मालोजीराजे देशमुख यांनी केले.
कातरखटाव येथे वडूज पोलीस ठाणे हद्दीतील गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची व व्यापाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी गणेशोत्सवाबाबत शासनाने जे नियमावली दिली आहे, त्याचे तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे. सार्वजनिक मंडळाची गणेशमूर्ती चार फुटांपेक्षा अधिक उंचीची नसावी तसेच घरगुती गणेशमूर्ती दोन फूट उंचीची असावी, असे अपेक्षित आहे. खर्चाचा अपव्यय टाळून गणेशोत्सव मंडळांनी रक्तदान, वृक्ष लागवड यासारखे उपक्रम रबवावेत, शक्य झाल्यास ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना राबवावी. गणेशमूर्तीचे आगमन, विसर्जनाच्या मिरवणुका काढून धुडगूस घालू नये.
तसेच कातरखटाव ग्रामपंचायतअंतर्गत नादुरुस्त सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्त करून घ्यावेत, व्यापाऱ्यांनीही सुरक्षेच्या दृष्टीने दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घेणे गरजेचे आहे. सध्या कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, कातरखटावसह खेड्या-पाड्यात बाधित रुग्ण सापडू लागले आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या अटी व शर्तीनुसार उत्सव साजरा करावा, अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सरपंच कांचन बोडके-बागल, उपसरपंच नितीन शिंगाडे, माजी सरपंच तानाजीशेठ बागल, बोराटे ग्रामसेवक, गोपनीय विभागाचे दीपक देवकर, पोलीसपाटील घनश्याम पोरे आदींची उपस्थिती होती.
फोटो - कातरखटाव ग्रामपंचायत बैठकीत मालोजी देशमुख यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कांचन बोडके-बागल, माजी सरपंच तानाजीशेठ बागल आदी उपस्थित होते. (छाया : विठ्ठल नलवडे )