वाहनांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:35 IST2021-04-05T04:35:18+5:302021-04-05T04:35:18+5:30
कऱ्हाड : शहरात फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. नियमबाह्य नंबरप्लेट पोलीस जप्त करीत ...

वाहनांवर कारवाई
कऱ्हाड : शहरात फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. नियमबाह्य नंबरप्लेट पोलीस जप्त करीत आहेत, तसेच संबंधित वाहनधारकांना दंडही केला जात आहे. वाहनधारकांनी फॅन्सी नंबरप्लेट वाहनाला वापरू नयेत. अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे.
वाहतूक कोंडी
रामापूर : पाटण शहरात लायब्ररी चौक ते झेंडा चौक यादरम्यान मोबाइलची केबल टाकण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यांमुळे मुख्य बाजारपेठ मार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. याचा त्रास वाहन चालक, व्यापारी, पादचाऱ्यांना होत आहे. संबंधित ठेकेदाराने त्वरित काम पूर्ण करून रस्ता पूर्ववत करण्याची मागणी केली जात आहे.
शेडची मागणी
कुसूर : घारेवाडी, ता. कऱ्हाड येथे एसटी थांबा शेड उभारण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. कऱ्हाड-ढेबेवाडी रस्त्याच्या चौपदरीकरण कामावेळी ठिकठिकाणचे शेड जमीनदोस्त करण्यात आले असून, ते पुन्हा बांधण्यात आले नाहीत. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असून, वाहनाची वाट पाहत उन्हात थांबावे लागत आहे.
नाल्यांची दुरवस्था
कऱ्हाड : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गानजीकच्या गटाराची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या नाल्यामध्ये कचरा साचून राहिल्यामुळे त्यातील पाणी व कचरा महामार्गालगतच्या उपमार्गावर येऊन पडत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. उपमार्गावरून दुचाकीस्वारांना जाताना मोठी कसरत करावी लागत आहे. गटारींची स्वच्छता करण्याची मागणी होत आहे.
विटा मार्ग खड्ड्यात (फोटो : ०४इन्फो०२)
कऱ्हाड : येथील कृष्णा कॅनॉलपासून ओगलेवाडीपर्यंत कऱ्हाड-विटा मार्गाची मोठी दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, अपघाताचा धोका वाढला आहे. त्याचबरोबर या मार्गालगत मोकाट श्वानांचा मोठ्या प्रमाणावर वावर असतो. तीन ते चार ठिकाणी स्थानिकांकडून कचराही टाकला जातो. त्यामुळेच वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.