मलकापुरात पालिकेसह आरोग्य विभागाची धडाकेबाज कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:30 IST2021-06-04T04:30:28+5:302021-06-04T04:30:28+5:30
विनाकारण फिरणाऱ्या ८८ जणांची रस्त्यांवरच कोरोना चाचणी ५ जण पॉझेटिव्ह असल्याचे निष्पन्न ....विलगिकरणात दाखल लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर : ...

मलकापुरात पालिकेसह आरोग्य विभागाची धडाकेबाज कारवाई
विनाकारण फिरणाऱ्या ८८ जणांची रस्त्यांवरच कोरोना चाचणी
५ जण पॉझेटिव्ह असल्याचे निष्पन्न ....विलगिकरणात दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : येथील पालिकेने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची कडक अंमलबजावणी करत गुरुवारी मलकापूर फाट्यावर धडाकेबाज कारवाई केली. पालिकेसह काले प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाने शहरात विनाकारण फिरणाऱ्या ८८ नागरिकांची रस्त्यावरच कोरोना चाचणी केली. त्यापैकी पाचजण बाधित आले असून, त्यांना विलगीकरणात दाखल केले.
येथील पालिकेच्या वतीने शहरात येणारे सर्व प्रवेशद्वार बंद केले होते. मलकापूरचे मुख्य प्रवेशद्वार मलकापूर फाटा या ठिकाणी बॅरिकेड लावले होते. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. आगाशिवनगर येथे इमर्सन कंपनी, शिवछावा चौक, मलकापूर फाटा, बैलबाजार रोडसह नऊ ठिकाणी व शहरात ये-जा करणाऱ्या नागरिकांची कसून चौकशी केली जात आहे. या ठिकाणी दिवसभर पालिकेचे कर्मचारी तळ ठोकून होते. मात्र गुरुवारी काले प्राथमिक आरोग्य केंद्रासह पालिकेच्या पथकाने मलकापूर फाट्यावर धडाकेबाज कारवाई केली. पोलीस संरक्षणात या ठिकाणी रस्त्यावरच शिबिर लावले. मलकापुरात येणाऱ्यांना चौकशी करूनच सोडले जात होते. मात्र विनाकारण फिरणाऱ्यांची रस्त्यावरच कोरोना चाचणी करण्यात आली. या वेळी ८८ नागरिकांची त्या जागेवरच कोरोना चाचणी करण्यात आली. या ८८ जणांपैकी ५ जण कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. त्या पाच जणांना पालिकेच्या रुग्णवाहिकेतून पार्ले येथील विलगीकरण कक्षात दाखल केले. या पथकात मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर, डॉ. टी. जी. कागदी, राजू पटेल, सुवर्णा पावणे, गणेश काळे, आर. एस. पाथरवट, ज्ञानदेव साळुंखे, दादासाहेब शिंदे, रामभाऊ शिंदे, सोमाजी गावडे, पंकज बागल, सुनील शिंदे, रमेश बागल, रामदास तडाखे सहभागी झाले होते.
चौकट
निगेटिव्ह असलेल्यांना दंड
मलकापुरात गुरुवारी विनाकारण फिरणाऱ्यांची धरपकड करत ८८ जणांची जागेवरच चाचणी केली. या वेळी बाधितांना विलगीकरणात भरती केले. तर निगेटिव्ह आलेल्यांवर दंडात्मक कारवाई केली.