फलटणमध्ये दुकाने, हॉटेल्सवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:40 IST2021-04-08T04:40:00+5:302021-04-08T04:40:00+5:30
फलटण : फलटण शहर व तालुक्यात जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश डावलून अत्यावश्यक सेवा वगळता चालू राहणारी इतर दुकाने व हॉटेल्सवर प्रांताधिकारी ...

फलटणमध्ये दुकाने, हॉटेल्सवर कारवाई
फलटण : फलटण शहर व तालुक्यात जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश डावलून अत्यावश्यक सेवा वगळता चालू राहणारी इतर दुकाने व हॉटेल्सवर प्रांताधिकारी यांनी स्वतः पुढाकार घेत कारवाई केली. व्यापाऱ्यांनी सर्व दुकाने शनिवार-रविवार वगळता इतर दिवशी चालू ठेवण्यासाठी शासनाकडे, प्रशासनाकडे निवेदन पाठविले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी अचानक सर्वच दुकाने ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार फलटण प्रशासनाच्यावतीने अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता सर्वच दुकाने बंद करण्यास सांगितले.
अनपेक्षितपणे दुकाने बंद करण्यास सांगितल्यावरून व्यापाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. कोणतीही पूर्वकल्पना नसल्यामुळे फलटणमधील सर्वच दुकाने काल आणि आज सकाळी ९ नंतर सुरू होती. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी रात्रीत काढलेल्या आदेशावरून प्रशासनाने सर्वत्र ३० एप्रिलपर्यंत तत्काळ दुकाने बंद ठेवण्यास सांगितले आहे. या निर्णयामुळे व्यापाऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे.
काल व आज अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर दुकाने व तीन परमिट रूम चालू ठेवल्याबद्दल प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव, मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून दंडात्मक कारवाई केलेली आहे. नगरपालिकेचेही कर्मचारी सर्वत्र फिरत असून, दुकाने उघडी ठेवणाऱ्यांवर कारवाई करताना दिसत आहेत.
फलटण तालुक्यात वाढणाऱ्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत दुकाने चालू राहतील व शनिवार, रविवार पूर्णतः बंद राहतील, असा आदेश दिला होता. मात्र अचानक अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच आस्थापना पूर्णतः बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. प्रशासनाच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली जात आहे.
सलग पूर्णतः लॉकडाऊन करण्यापेक्षा टप्प्या-टप्प्याने लॉकडाऊन करण्यास हरकत नाही. मात्र ३० एप्रिलपर्यंत करण्यात आलेल्या या लॉकडाऊनला आमचा तीव्र विरोध असल्याचे व्यापारी संघटनेने स्पष्ट केले आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी प्रशासनाला दिले आहे.
०७फलटण
फलटणमध्ये दुकानांंवर प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी कारवाई केली.