सधन असूनही रेशन घेणाऱ्यांवर आता कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:14 IST2021-02-05T09:14:47+5:302021-02-05T09:14:47+5:30
शासनाकडून रेशनिंग धान्याचा पुरवठा केला जातो; मात्र अनेक ठिकाणी लाभार्थींपर्यंत धान्य पोहोचत नाही, तर काही ठिकाणी सधन कुटुंबेच या ...

सधन असूनही रेशन घेणाऱ्यांवर आता कारवाई
शासनाकडून रेशनिंग धान्याचा पुरवठा केला जातो; मात्र अनेक ठिकाणी लाभार्थींपर्यंत धान्य पोहोचत नाही, तर काही ठिकाणी सधन कुटुंबेच या धान्याचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतात. त्यामुळे सधन कुटुंबांचा शोध घेऊन त्यांचे धान्य बंद करण्याबरोबरच मूळ लाभार्थींपर्यंत अन्नधान्याचा पुरवठा करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून धान्य घेणाऱ्या सधन कुटुंबांची शोधमोहीम पुरवठा विभागाने हाती घेतली आहे. शासनाच्या रेशन योजनेचा लाभ घेणारी व्यक्ती अथवा त्याच्या कुटुंबातील कोणी सदस्य डॉक्टर, स्थापत्य विशारद, चार्टर्ड अकाउंटंट असेल अथवा कुटुंबातील कोणतीही व्यक्ती व्यवसाय कर, विक्रीकर किंवा आयकर भरीत असेल तर संबंधिताला रेशनचा लाभ घेण्याचा अधिकार नाही. त्याचबरोबर टॅक्सी व रिक्षा वगळून ज्या कुटुंबात चारचाकी वाहन, बंगला आहे. नोकरदार व्यक्ती आहे. तसेच ग्रामीण भागात ज्यांचे वार्षिक उत्पन्न ४४ हजार रुपयांपेक्षा जास्त व शहरी भागात ५९ हजारांपेक्षा जास्त आहे, अशा व्यक्तींनी तत्काळ रेशन दुकानदारांकडे जाऊन ‘अन्नधान्याच्या योजनेतून बाहेर पडा’ योजनेचे स्वयंघोषणापत्र भरून द्यायचे आहे. ३१ जानेवारीपर्यंत हे स्वयंघोषणापत्र भरून देण्यास मुदत ठेवण्यात आली आहे. त्यानंतर १ फेब्रुवारीपासून पुरवठा विभागाकडून सधन उत्पन्न गटातील कुटुंबांच्या शिधापत्रिकांची शोधमोहीम सुरू केली जाणार आहे. तसेच सधन कुटुंबात असूनही घोषणापत्र भरून दिले नसल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई केली जाणार आहे. धान्याचा लाभ घेतल्यापासून आजअखेरपर्यंत चालू बाजारभावाप्रमाणे त्यांच्याकडून धान्याची वसुलीही केली जाणार आहे.
- चौकट
आधार लिंक नसल्यास रेशन बंद
दरम्यान, शिधापत्रिकेला आधारकार्ड लिंक नसल्यास १ फेब्रुवारीपासून संबंधित कुटुंबाचा रेशन पुरवठा बंद होणार आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील प्राधान्य कुटुंब लाभार्थी व अंत्योदय अन्न योजनेतील सर्व लाभार्थींचे आधार अद्ययावतीकरण तसेच कुटुंबातील किमान एका व्यक्तीचा मोबाइल नोंदणी करण्याच्या सूचना केंद्र शासनाने दिल्या आहेत. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांना ३१ जानेवारीपर्यंत त्यांच्या शिधापत्रिकेला आधार लिंक करावे लाणार आहे.