साठ तळीरामांवर वाहन चालविताना कारवाई
By Admin | Updated: September 29, 2014 00:49 IST2014-09-29T00:49:33+5:302014-09-29T00:49:33+5:30
निवडणूक पार्श्वभूमी : विविध ठिकाणी तपासणी केंद्रे

साठ तळीरामांवर वाहन चालविताना कारवाई
सातारा : मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या तसेच अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध पोलिसांनी जिल्ह्यामध्ये विशेष मोहीम उघडली आहे. या मोहिमेदरम्यान मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या ६० जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यामुळे वाहन चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जिल्ह्यात विविध ठिकाणी नाकाबंदी केंद्रे उभारली आहेत. प्रत्येक वाहनाची आणि चालकाची कसून तपासणी करण्यात येत आहे. विशेषत: मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या चालकांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा आणि वाहतूक शाखेच्या वतीने ही कारवाई करण्यात येत आहे. ब्रेथ अॅनालायझर मशीनच्या साह्याने वाहन चालकाची तपासणी करण्यात येत आहे. केवळ तीन दिवसांत साठजण वाहन चालविताना मद्यपान केल्याचे पोलिसांना सापडले. एवढ्या मोठ्या प्रमाणात मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या चालकांची संख्या पाहता अपघाताला हेच कारण कारणीभूत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. अपघात झाल्यानंतर घटनास्थळाहून चालक फरार होत असतो. त्यामुळे त्याने मद्यपान केले आहे का, हे समजत नाही. परिणामी ज्याचे नुकसान झाले आहे. त्याला न्याय मिळत नाही. खासगी वाहनचालक, ट्रक, रिक्षा, जीप, ट्रॅक्टर आदी वाहनचालकांची पोलीस कसून तपासणी करत आहेत. ब्रेथ अॅनालायझरमध्ये दोषी आढळलेल्या चालकांवर मोटारवाहन कायद्याचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही मोहीम अशीच सुरू राहाणार असल्याचे वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)