पैसे उकळण्यासाठी माझ्याविरोधात कारवाई
By Admin | Updated: July 22, 2014 22:49 IST2014-07-22T22:38:50+5:302014-07-22T22:49:46+5:30
कंग्राळकर : गालफाडे, मोरे यांच्यावर गंभीर आरोप

पैसे उकळण्यासाठी माझ्याविरोधात कारवाई
सातारा : अवैध उत्खनन प्रकरणात कारवाईच्या जाळ्यात अडकलेले बांधकाम व्यावसायीक श्रीधर कंग्राळकर यांनी तहसीलदारांच्या कारवाईविरोधात थेट प्रांताधिकाऱ्यांकडे दावा ठोकला आहे. पैसे उकळण्यासाठी काही लोकांच्या दबावामुळे तहसीलदारांनी कारवाई केल्याचा गंभीर आरोपही त्यांनी वकीलांच्या माध्यमातून केलेल्या तक्रारीत तहसीलदारांसह किशोर गालफाडे व सुशांत मोरे यांच्याविरोधात केला आहे.
शहरात राधिका रस्त्यावरील जागेत अनधिकृतरीत्या उत्खनन केल्याप्रकरणी तहसीलदार राजेश चव्हाण यांनी बांधकाम व्यावसायिक श्रीधर आनंदराव कंग्राळकर यांना २२ लाख ९५ हजार ७०० रुपये दंडाची नोटीस धाडली होती. कंग्राळकर यांनी राधिका रस्त्यावरील सि.स.नं.२८३/१अ प्लॉट नं. १ मध्ये उत्खनन केले आहे. मंडलाधिकाऱ्यांमार्फत केलेल्या पंचनाम्यावरुन तहसीलदार राजेश चव्हाण यांनी कंग्राळकर यांना दंडाची नोटीस बजावली होती. या नोटीसीची मुदत बुधवारी (दि. २३) संपत आहे.
संबंधित जागेवर खोदकाम करण्याआधी प्रांताधिकाऱ्यांकडे रॉयल्टीची रक्कम भरल्याचा दावा त्यांनी केला आहे. तर त्यांनी केवळ १ हजार ब्रासची रॉयल्टी भरुन तब्बल ३ हजार ८७ ब्रासचे उत्खनन केल्याचे मंडलाधिकाऱ्यांनी केलेल्या पंचनाम्यावरुन समोर आले आहे. मात्र, या पंचनाम्याची नोटीस मिळाली नाही. हा पंचनामा एकतर्फी करण्यात आला. या पंचनाम्यातील मोजमापे ही ढोबळ मानाने लिहिलेली असून ती पूर्णत: चुकीची आहेत. तसेच तहसीलदारांनी दिलेली नोटीसही बेकायदा आहे, असे कंग्राळकर यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तसेच उच्च न्यायालयाच्या एका आदेशाचा आधार घेत कंग्राळकर यांनी इमारतीच्या पायाभरणीसाठी केलेल्या खोदकामासाठी रॉयल्टी द्यावी लागत नाही, अशी या तक्रारीत नोंद केलेली आहे. (प्रतिनिधी)