निवडणुक काळासाठी मायणीतील १४८ जणांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 15:35 IST2017-10-11T15:29:16+5:302017-10-11T15:35:11+5:30
मायणी ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून १४८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

निवडणुक काळासाठी मायणीतील १४८ जणांवर कारवाई
मायणी : मायणी ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून १४८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यातील संवेदनशील गावांच्या यादीत मायणीचा समावेश आहे. तसेच सध्या मायणी ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मायणी पोलिस दूरक्षेत्र व वडूज पोलिस स्टेशन यांनी समाजकंटकांची माहिती घेतली.
मागील विविध गुन्ह्यात असलेल्या लोकांची माहिती घेऊन १४८ जणांची नावे निश्चित करून ६५ जणांना निवडणुकीच्या काळामध्ये चार दिवस तडीपार करण्यात येणार आहे. या सर्वांना मतदानादिवशी फक्त चार तास येता येणार आहे. तसेच १३ जणांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. ७० जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शांतता अबाधित राखण्यासाठी या १४८ जणांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक संतोष गोसावी यांनी दिली.