आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचे नाव शासकीय अभिवादन यादीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:12 IST2021-02-05T09:12:03+5:302021-02-05T09:12:03+5:30

फलटण : ‘महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या पाठपुराव्यानंतर मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव राज्य शासनाच्या राष्ट्रपुरुष, ...

Acharya Balshastri Jambhekar's name in the government greeting list | आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचे नाव शासकीय अभिवादन यादीत

आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचे नाव शासकीय अभिवादन यादीत

फलटण : ‘महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या पाठपुराव्यानंतर मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव राज्य शासनाच्या राष्ट्रपुरुष, थोर व्यक्ती यांच्या शासकीय अभिवादन यादीत नव्याने समाविष्ट करण्यात आले आहे,’ अशी माहिती महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी फलटणचे संस्थापक-अध्यक्ष रवींद्र बेडकीहाळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

बेडकीहाळ यांनी सांगितले की, ‘राज्य शासनाच्या मंत्रालय, विधिमंडळ, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद व अन्य शासकीय, निमशासकीय जिल्हा व तालुका कार्यालये यातून विविध क्षेत्रांत ऐतिहासिक उल्लेखनीय असे कार्य करणाऱ्या राष्ट्रपुरुष, थोर व्यक्तींना त्यांच्या जयंती, पुण्यतिथीदिवशी राज्य शासनाच्यावतीने अभिवादन करण्यात येते. या शासकीय यादीमध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचे नाव शासनाने समाविष्ट करावे, अशी मागणी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या जन्मगावी पोंभुर्ले (ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) येथे महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीने उभारलेल्या ‘दर्पण’कारांच्या स्मारकाच्या विकास व सुशोभिकरण कामासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व संबंधित मंत्री, सचिव व अधिकारी यांची एक विशेष बैठक मंत्रालयातील त्यांच्या दालनात दि. ५ जानेवारी २०१२१ रोजी आयोजित केली होती. त्यामध्ये विकास व सुशोभिकरण कामांबरोबरच आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचे नाव राज्य शासनाच्या अभिवादन यादीत घ्यावे, अशी मागणी आम्ही आग्रहाने केली होती. अजित पवार यांनी यावेळी उपस्थित सामान्य प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून या यादीची सविस्तर माहिती घेऊन तातडीने बाळशास्त्री जांभेकरांचे नाव या यादीत घ्यावे, असे निर्देश या बैठकीतच दिले होते. त्यानंतर राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने नाव यादीत समाविष्ट केल्याचे शासनाच्यावतीने जाहीर केले आहे.’

Web Title: Acharya Balshastri Jambhekar's name in the government greeting list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.