आरोपी विरेंद्र तावडेही साताऱ्याचाच!
By Admin | Updated: June 12, 2016 00:31 IST2016-06-12T00:31:44+5:302016-06-12T00:31:44+5:30
दाभोलकर हत्या प्रकरण : ‘गणपती दान’ चळवळीला केला होता कडाडून विरोध

आरोपी विरेंद्र तावडेही साताऱ्याचाच!
सातारा : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेला आरोपी डॉ. विरेंद्र तावडे हा मूळचा साताऱ्याचाच असून, दहा वर्षांपूर्वी दाभोलकरांनी साताऱ्याच्या तळ्यांवर राबविलेल्या ‘गणपती दान’ चळवळीला कडाडून विरोध करण्यात या विरेंद्रचा किती सहभाग होता, याचीही चौकशी आता ‘सीबीआय’ने सुरु केल्याची माहिती ‘लोकमत’च्या हाती आलीय.
दाभोलकर हत्या प्रकरणाचा कसोशीने तपास करणारी ‘सीबीआय’ आता साताऱ्यातील दहा वर्षांपूर्वीच्या त्या वादग्रस्त घटनांचा शोध घेत असून, आरोपीच्या डोक्यात तेव्हापासूनच ‘दाभोलकर द्वेष’ होता की काय, याचीही चाचपणी सुरू केलीय. विरेंद्रचे शिक्षण जरी मुंबईत झाले असले तरी त्याचे बहुतांश नातेवाईक आजही साताऱ्यातच आहेत. उच्च शिक्षणानंतर विरेंद्रने ‘निधी’ नामक पंजाबी तरुणीशी प्रेमविवाह केला. त्यानंतर दोघांनीही नोकरीसाठी साताऱ्यातच आसरा घेतला होता. दहा वर्षांपूर्वी सातारा येथील ‘चिरायु’ हॉस्पिटलमध्ये निधी तावडे ‘बालरोगतज्ज्ञ’ म्हणून काम करत असताना तिची पत्नी डॉ. चित्रा नरेंद्र दाभोलकर यांच्यासोबत ओळखही झाली होती.
साताऱ्यात असताना पत्नी कमवत असली तरी विरेंद्र मात्र तेव्हापासूनच ‘जनजागृती’सारख्या संस्थांशी निगडीत होता. खर्च झेपेना म्हणून अखेर या पती-पत्नीने मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला.
विरेंद्रचे काका आजही साताऱ्यातच !
विरेंद्रचे काका गेल्या अनेक दशकांपासून साताऱ्यातील जुने जाणते कान-नाक-घसा तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. विरेंद्र दाम्पत्याला साताऱ्यातच स्थिर करण्यासाठी या डॉक्टर काकांनीही खूप प्रयत्न केले होते. मात्र, डोक्यात काहीतरी वेगळ्याच कल्पना असणाऱ्या विरेंद्रने अखेर संस्थेचे कार्य अधिकाधिक व्यवस्थित करता यावे, यासाठी डॉक्टरी पेशाकडेही दुर्लक्ष केल्याचे तपासात स्पष्ट होत आहे.(प्रतिनिधी)