वीस वर्षांची शिक्षा झालेला आरोपी म्हणतोय,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:10 IST2021-02-05T09:10:28+5:302021-02-05T09:10:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर भल्या भल्या आरोपींची पाचावर धारण बसते. काही जणांना रडू कोसळते तर ...

Accused sentenced to twenty years says, | वीस वर्षांची शिक्षा झालेला आरोपी म्हणतोय,

वीस वर्षांची शिक्षा झालेला आरोपी म्हणतोय,

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर भल्या भल्या आरोपींची पाचावर धारण बसते. काही जणांना रडू कोसळते तर काही जणांना भोवळ येते. मात्र, सोमवारी जिल्हा न्यायालयात या उलट घडलं. न्यायाधीशांनी एका आरोपीला तब्बल २० वर्षे शिक्षा देत असल्याचे सांगूनही त्याच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाचा कसलाही लवलेश नव्हता. उलट न्यायालयातून तो बाहेर आल्यानंतर काही जण त्याचा फोटो काढत होते. तेव्हा निर्ढावलेला आरोपी म्हणतोय, थांबा, केस विंचारू द्या, मगच फोटो काढा, हे एकून सारेच अवाक्‌ झाले.

तेरा वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नंदन आडागळे याला न्यायालयाने वीस वर्षांची शिक्षा सुुनावली. एवढी मोठी शिक्षा ऐकून खरं तर भल्याभल्या आरोपींची पाचावर धारण बसते. मात्र, नंदन आडागळे याला अपवाद ठरलाय. पतीला वीस वर्षांची शिक्षा झाल्याचे ऐकून पत्नी न्यायालयात ढसाढसा रडत होती, तर नंदन पत्नीला म्हणतोय, रडू नकोस, माझ्या मनाची तयारी केलीय. आता जेलमध्येच मरायचं. या दोघांची बातचीत जवळच उभे असलेले काही पोलीस कर्मचारी ऐकत होते. काही वेळानंतर नंदनला न्यायालयातून बाहेर आणण्यात येत होते. त्यावेळी एकाने त्याला फोटो काढू द्या, असं म्हटलं. तर त्याने थांबा, केस विंचरू द्या, मगच फोटो काढा, असं म्हणून त्याने खरोखरच केस विंचरले. हा प्रकार पाहून पोलिसांसकट सारेच अवाक्‌ झाले. ज्याच्यामुळे पीडित कुटुंबाला घर सोडावं लागलं, अशा आरोपीची वर्तणूक पाहून अनेकांना संताप अनावर झाला. खेळण्या- बागडण्याच्या वयात मुलीवर अत्याचार झाल्याने आई- वडील मनातून अक्षरश: तुटले. शेतात येता-जाता लोक टोचून बोलू लागले. हे सहन झालं नाही म्हणून त्यांनी कायमचं घर सोडण्याचा निर्णय घेतला. पुण्यासारख्या शहरात बहिणीने त्यांना आसरा दिला. धुणीभांडी करून दोन मुलींना हिमतीने वाढविण्यासाठी आईचे प्रयत्न सुरू आहेत. पण, या घटनेनं त्यांचं आख्खं आयुष्यच बदलून गेलंय. सातारा जिल्हा न्यायालयात सुनावणीला हजर होण्यासाठी हे पीडित कुटुंब पुण्याहून साताऱ्यात यायचं, त्यावेळी गावची आठवण त्यांना यायची. कधी कधी गावाला जावेहे वाटायचे. पण, मनात पुन्हा मागचे टोचून बोललेले आठवायचे. त्यामुळे त्यांनी गावी न जाण्याचा निर्णय घेतला. पण, आता पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्याला वीस वर्षांची शिक्षा झाल्याचे ऐकून त्यांना फार आनंद झालाय. एक ना एक दिवस न्याय मिळाला. आता आम्ही नक्कीच आमच्या गावी जाणार, असे भावनाविवश होऊन पीडित मुलीच्या आईनं सांगितलं.

Web Title: Accused sentenced to twenty years says,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.