जिल्हा रुग्णालयातून दरोड्यातील आरोपीचे पलायन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:34 IST2021-04-05T04:34:41+5:302021-04-05T04:34:41+5:30
सातारा : कोरोनाबाधित व दरोड्याच्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या आरोपीने जिल्हा शासकीय रुग्णालयातून पलायन केल्याने जिल्हा पोलीस दलात प्रचंड खळबळ ...

जिल्हा रुग्णालयातून दरोड्यातील आरोपीचे पलायन
सातारा : कोरोनाबाधित व दरोड्याच्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या आरोपीने जिल्हा शासकीय रुग्णालयातून पलायन केल्याने जिल्हा पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. ही खळबळजनक घटना रविवारी पहाटे पाचच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी, मध्यप्रदेशमधील एका २३ वर्षीय युवकाला उंब्रज पोलिसांनी दरोड्याचा गुन्ह्यात अटक केली होती. गत काही दिवसांपासून संबंधित संशयित आरोपी जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता. दरम्यान, चार दिवसांपूर्वी त्याला कोरोनाची लागण झाल्याने त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोरोना वाॅर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याच्या सुरक्षिततेसाठी एका पोलिसाची नेमणूक करण्यात आली होती. दरम्यान, रविवारी पहाटे पाचच्या सुमारास अचानक संबंधित आरोपीने पोलीस कर्मचाऱ्याची नजर चुकवून सिव्हिलमधून पलायन केले. हा प्रकार बंदोबस्तावर असलेल्या पोलिसाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीन हादरली. संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने आरोपीने पलायन केल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर सातारा शहर, एलसीबीची टीम सिव्हिलमध्ये दाखल झाली. सिव्हिलमधील सीसीटीव्ही फुटेजची पोलिसांनी तपासणी केल्यानंतर संबंधित आरोपी कुठल्या प्रवेशद्वारातून पळून गेला, हे समोर आले. त्याच्या शोधासाठी पोलिसांच्या दोन टीम विविध ठिकाणी रवाना झाल्या आहेत.
चाैकट : हलगर्जीपण बेततोय नाेकरीवर!
तीन महिन्यांपूर्वी जिल्हा शासकीय रुग्णालयात असाच काहीसा प्रकार घडला होता. त्यावेळी रुग्णालयात असलेल्या आरोपीने झोपलेल्या पोलिसाला पाहून चक्क प्रात्यक्षिक केले होते. आपण इथून पळू जाऊ शकतो, असे तो इतर रुग्णांना सांगत होता. मात्र, त्याच्या खाटेशेजारी झोपलेल्या पोलिसाची दया त्याला आल्याने तो पळून गेला नाही; पण तो पळून गेला असता तर त्या पोलिसाचा हलगर्जीपणा नोकरीवर बेतला असता. आता पुन्हा एकदा खरोखरच आरोपी पळून गेल्याने संबंधित पोलिसाचा हलगर्जीपणा नोकरीवर बेतण्याची शक्यता आहे.