पाहुण्यांचं आवतन; पण बिबटोबाची भीती
By Admin | Updated: November 6, 2014 00:02 IST2014-11-05T23:53:29+5:302014-11-06T00:02:42+5:30
उंडाळे भागात यात्रांचा हंगाम : जेवणाचा बेत असूनही पै-पाहुण्यांची पाचावर धारण

पाहुण्यांचं आवतन; पण बिबटोबाची भीती
ज्ञानेश्वर शेवाळे - उंडाळे -कऱ्हाड तालुक्यातील उंडाळेसह येवती भागातील गावांचा यात्रांचा हंगाम सध्या सुरू झाला आहे. ग्रामस्थ आपल्या पै-पाहुण्यांना जेवणासाठी निमंत्रण धाडतायत; पण बिबटोबाच्या भीतीने पाहुण्यांनी हात आखडता घेतलाय. बिबट्याने जीपवर झेप घेतली; मग आपल्या दुचाकीची काय बिशाद? या विचाराने पाहुण्यांची पाचावर धारण बसलीय. पाहुणा जेवायला बोलवतोय; मात्र बिबट्या भीती दाखवतोय, अशी परिस्थिती सध्या पाहावयास मिळत आहे.
उंडाळे विभागात गत अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर आहे. या बिबट्याने अनेक ग्रामस्थांना दर्शन दिले आहे. मुळात उंडाळे हा डोंगरी विभाग आहे. त्यामुळे परिसरात अनेक श्वापदांचा वावर आहे. त्यामुळे येथे बिबट्याचे दर्शन होणे, ही नवलाची बाब नाही. कोल्हा, लांडगा, रानडुक्कर, तरस असे अनेक प्राणी या परिसरात वावरतायत. त्याचप्रमाणे बिबट्याही वावरतोय. बिबट्याचा जोपर्यंत वावर होता, तोपर्यंत ठिक होतं. मात्र, त्याने हल्ला करण्यास सुरुवात केली, त्यामुळे ग्रामस्थ घाबरले.
शेतात जनावरे चारण्यास गेल्यानंतर अनेक जनावरांना बिबट्याने शिकार बनवले आहे. गुराख्यांच्या समोरच बिबट्या जनावरांचा फडशा पाडतोय. त्यामुळे ग्रामस्थ भयभीत झालेत. काही महिन्यांपूर्वी बांदेकरवाडी येथे बिबट्याने एका ग्रामस्थावर हल्ला केला होता. त्यानंतर तर ग्रामस्थांनी बिबट्याची धास्तीच घेतली. प्रत्येक गावात बिबट्याची चर्चा आणि बिबट्याचीच भीती.
बिबट्याच्या या हल्लासत्राने ग्रामस्थांची घाबरगुंडी उडाली असतानाच सोमवारी रात्री घडलेल्या घटनेने ग्रामस्थांच्या तोंडचे अक्षरश: पाणी पळविले. सोमवारी रात्री उंडाळेहून येवतीकडे प्रवासी घेऊन निघालेल्या प्रवासी जीपवर बिबट्याने झेप घेतली. नुसती झेप घेऊन तो थांबला नाही, तर त्याने प्रवाशावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने या घटनेतून संबंधित प्रवासी बचावला.
चालकाने जीपचा वेग वाढविल्याने बिबट्या जीपमधून बाहेर फेकला गेला. त्यानंतर अंधारात तो पसार झाला. या घटनेमुळे आता वाहनधारकही चांगलेच घाबरले आहेत. चारचाकी वाहनधारकांत जास्त भीती नसली तरी दुचाकीधारक मात्र अंधार पडण्यापूर्वीच घर गाठत आहेत. उंडाळेसह येवती परिसरातील बहुतांश गावांच्या यात्रांचा हंगाम सुरू आहे. पाहुण्यांना जेवणाचे निमंत्रणही दिले जात आहे. मात्र, बिबट्याच्या भीतीमुळे पै-पाहुणे जेवायला जाण्यास धजावत नाहीत. पाहुण्यांना फोन केल्यानंतर बिबट्याच्या भीतीमुळे ‘जेवण नको रे बाबा’ असे उत्तर ग्रामस्थांना ऐकावयास मिळत आहे.
येवतीची यात्रा आठ तारखेला आहे. आमच्या पाहुण्यांनी आम्हाला निमंत्रण दिलंय; पण लटकेवाडीतील बिबट्याची घटना कानावर आल्यानंतर जेवायला जाण्याचा बेत आम्ही रद्द केलाय. दरवर्षी आम्ही येवतीच्या पाहुण्यांकडे यात्रेला जातो. मात्र, यावर्षी आम्ही जाणार नाही.
- राजेश पवार, कऱ्हाड
येवतीनंतर नांदगाव, भुरभुशीची यात्रा
उंडाळे विभागातील येवती, नांदगाव व भुरभुशी ही लोकसंख्येच्या मानाने मोठी गावे आहेत. त्यामुळे या गावांतील ग्रामस्थांचा पै-पाहुण्यांचा गोतावळाही मोठा आहे. येवती गावची यात्रा येत्या सात आणि आठ तारखेला तर नांदगाव, भुरभुशीची यात्रा त्यानंतर पंधरा दिवसांत होणार आहेत. मात्र, या यात्रांवर बिबट्याच्या भीतीचे सावट आहे. रात्रीच्या वेळेस जेवायला जाणे धोक्याचे ठरणार असल्याने पै-पाहुणे भयभीत आहेत.