त्रिपुटीजवळ अपघात; पत्नी ठार, पती जखमी

By Admin | Updated: June 13, 2015 23:57 IST2015-06-13T23:57:57+5:302015-06-13T23:57:57+5:30

ट्रकची धडक : चालक पसार

Accident near Tripura; Wife killed, husband injured | त्रिपुटीजवळ अपघात; पत्नी ठार, पती जखमी

त्रिपुटीजवळ अपघात; पत्नी ठार, पती जखमी

सातारा : कोरेगाव-सातारा रस्त्यावरील त्रिपुटी खिंडीजवळ ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील पत्नी जागीच ठार झाली असून पती गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास झाला.
शोभा नंदू कांबळे (वय ३८) असे ठार झालेल्या पत्नीचे नाव असून, नंदू शिवराम कांबळे (४३, रा. विकासनगर, खेड सातारा) असे जखमी पतीचे नाव आहे. याबाबत जिल्हा शासकीय रुग्णालयातील पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कोरेगावहून मोटारसायकलवरून (एमएच ११ एव्ही ३७८८) कांबळे दाम्पत्य साताऱ्याकडे येत होते.
कोरेगाव तालुक्यातील त्रिपुटी खिंडीजवळ ते आल्यानंतर सातारा बाजूकडून सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रकने (एमएच २५ यू ४९४५) त्यांना समोरून जोरदार धडक दिली. यामध्ये पत्नी शोभा यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या डोक्याला आणि हातापायाला गंभीर जखमा झाल्या होत्या, तर पती नंदू हे गंभीर जखमी झाले. हा अपघात झाल्यानंतर चालकाने ट्रक घटनास्थळी सोडून पलायन केले. बराचवेळ कांबळे दाम्पत्य घटनास्थळी पडून होते.
काही वेळानंतर रुग्णवाहिकेतून दोघांनाही जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत कोरेगाव पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली नव्हती. (प्रतिनिधी)

 

Web Title: Accident near Tripura; Wife killed, husband injured