बोरगावजवळ अपघात; चार जखमी
By Admin | Updated: July 21, 2014 23:07 IST2014-07-21T23:07:15+5:302014-07-21T23:07:38+5:30
अपघात सोमवारी रात्री झाला

बोरगावजवळ अपघात; चार जखमी
नागठाणे : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर येथील बोरगाव, ता. सातारा येथील पुलाजवळ एसटी बस, जीप आणि टेम्पोचा तिहेरी अपघात झाला. यामध्ये चारजण जखमी झाले. हा अपघात सोमवारी रात्री आठ वाजता झाला.
‘भारत सरकार’ असे लिहिलेली जीप (एमएच १२ बीजे १५४७) नागठाणेहून साताऱ्याकडे येत होती. बोरगावजवळ आल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने जीप उलटली. याचवेळी आयशर टेम्पो (एमएच १३ जीए २१७६) साताऱ्याकडे येत होता. या टेम्पो चालकाने हा अपघात पाहण्यासाठी ब्रेक दाबला. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या एसटीने (एमएच ०७ सी ९५७१) टेम्पोला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, एसटी चालक केबीनमध्ये अडकून पडला. तब्बल एक तासानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन एसटी चालकाला बाहेर काढले. त्यानंतर रुग्णवाहिकेने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. शासकीय जीपमध्ये नेमके कोण होते, हे अद्याप पोलिसांना समजले नाही. अपघात झाल्यानंतर त्या जीपमधील तीन जखमी जवळच्याच रुग्णालयात स्वत:हून दाखल झाले. या अपघाताने महामार्गावर बराचवेळ वाहतूक ठप्प झाली होती. (वार्ताहर)