उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय हलविण्याच्या हालचालींना वेग!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:51 IST2021-06-16T04:51:12+5:302021-06-16T04:51:12+5:30
लोकमत न्युज नेटवर्क वडूज : येथील पोलीस ठाणे नवीन अद्ययावत अशा ग्रीन इमारतीमध्ये काही दिवसांतच गृहप्रवेश करून पोलीस ठाण्याचा ...

उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय हलविण्याच्या हालचालींना वेग!
लोकमत न्युज नेटवर्क
वडूज : येथील पोलीस ठाणे नवीन अद्ययावत अशा ग्रीन इमारतीमध्ये काही दिवसांतच गृहप्रवेश करून पोलीस ठाण्याचा कारभार या नूतन इमारतीत सुरू होणार आहे. या इमारत परिसरातून यापूर्वीच अनेक कार्यालये गेली. त्यामुळे भक्कम जुनी इमारत ही वापराविना अडगळ होण्याची शक्यता आहे. सध्या भाडेतत्त्वावर असणारे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय या ठिकाणी स्थानापन्न व्हावे, यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. आजपर्यंत जन आंदोलनाशिवाय या हुतात्म्यांच्या भूमीला न्याय मिळाला नाही, हा इतिहास आहे.
खटाव तालुक्यातील वडूज येथे दहिवडी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय (कॅम्प वडूज) हे गत सतरा वर्षांपासून भाडेतत्त्वावर आहे. खटाव तालुक्यातील वडूज, औंध, मायणी, पुसेसावळी पोलीस ठाणे तर माण तालुक्यातील म्हसवड, दहिवडी ही दोनच पोलीस ठाणे या विभागाअंतर्गत कार्यरत आहेत. वडूजमध्ये जिल्हास्तरीय न्यायालय, कनिष्ठ न्यायालय असून खटाव तालुक्याचा क्राईम रेट पाहता हे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय वडूज येथेच असणे कायदा व सुव्यवस्थेसाठी फार महत्त्वाचे आहे. जिल्हाधिकारी यांची नाममात्र भाडेतत्त्वावर मान्यता असताना देखील या इमारतीचे नेमके नगरपंचायतीला वावडे का? हा सध्या संशोधनाचा विषय ठरत आहे. वडूज शहरातील या इमारतीचे बांधकाम हे पूर्ण दगडी असून, १९६५ साली या इमारतीचे काम पूर्ण करण्यात आले होते. या इमारतीत पोलीस ठाण्याचा कारभार चालतो. या ठिकाणी सध्या फक्त पोलीस ठाणे, वडूज चावडी, सेतू कार्यालय व आधारकार्ड केंद्र आहेत.
पोलीस ठाण्याचेसुद्धा लवकरच दहिवडी-कऱ्हाड रस्त्यावर जिल्ह्यातील पहिल्या ग्रीन इमारतीमध्ये स्थलांतर होणार असल्याने सध्या सुस्थितीत असणाऱ्या इमारत वापराविना अडगळ होणार असल्याची भीती सर्वसामान्य घटकांतून व्यक्त होत आहे. यावर स्थानिक लोकप्रतिनिधी व संबंधित प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन इमारतीचा सुयोग्य वापर करून ती वापरात ठेवावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय हे याच जागेत यावे, यासाठी यापूर्वी वकील बार असोसिएशन, सामाजिक कार्यकर्ते व खटाव तालुक्यातील राजकीय नेत्यांची धडपड सुरू आहे.
--------------------------------------
कोट..
वडूज येथे प्रांत कार्यालय मंजूर असताना दहिवडी येथे हलविण्यात आले. मात्र, आता सामाजिक चळवळ उभारून सर्वपक्षीय कार्यकर्ते व नेतेमंडळी एकत्रित येऊन आणि विचारविनिमय करून हे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय वडूजमध्येच राहील. यासाठी प्रयत्नशील राहणे फार अत्यावश्यक आहे.
-प्रा. नागनाथ स्वामी (जिल्हा सचिव, अखिल भारतीय ग्राहक पंचायत)
फोटो: वडूज येथे सध्या भाडेतत्त्वावर असलेले उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय.