नाराजांच्या तहकुबीला गैरहजेरीचं निमित्त!

By Admin | Updated: March 2, 2016 23:56 IST2016-03-02T22:17:24+5:302016-03-02T23:56:45+5:30

राष्ट्रवादीचा स्वतंत्र गट अस्वस्थच : अर्थसंकल्पीय सभेचा मुहूर्त साधत विरोधात बसण्याचा इशारा प्रत्यक्षात..

The absence of displeasure is the absence of absence! | नाराजांच्या तहकुबीला गैरहजेरीचं निमित्त!

नाराजांच्या तहकुबीला गैरहजेरीचं निमित्त!

सातारा : ‘राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात अजित पवारांच्या शब्दाला किंमत राहिली नाही, त्यामुळे पदाधिकारी राजीनामा देत नसतील तर स्वतंत्र गट करून विरोधात बसण्याची आमची तयारी आहे,’ अशी संतापजनक खंत व्यक्त करत ८ फेब्रुवारी २०१६ रोजी जिल्हा परिषदेतील २५ सदस्यांनी बंडाचा इशारा दिला होता. हाच इशारा राष्ट्रवादीच्या नाराज सदस्यांनी बुधवारी (दि. २ मार्च) अर्थसंकल्पाच्या सभेत खरा करून दाखविला. ‘लोकमत’ ने याबाबत ९ फेब्रुवारीच्या अंकात वृत्त प्रसिद्ध केले होते.
जिल्हा परिषदेतील विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याचा विषय गेल्या दोन महिन्यांपासून ऐरणीवर आहे. संबंधितांनी राजीनामा देऊन नव्यांना संधी द्यावी, अशी सुप्त इच्छा असणारी राष्ट्रवादीमधील जिल्हा परिषद सदस्य अनेक दिवसांपासून चळवळीच्या भूमिकेमध्ये आहेत. ‘अजित पवार हे पक्षाचे प्रमुख नेते आहेत, त्यांच्या शब्दालाही पक्षात किंमत राहिलेली नाही. नेत्यांचे आदेश न मानता पदाधिकारी जर पदाला चिकटून बसतच असतील, तर आम्ही राजीनामा देतो, अथवा स्वतंत्र राहतो, पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याबाबत आजच काय तो निर्णय घ्या. ज्यांनी राजीनामे दिले आहेत, ते तरी मंजूर करून घ्या,’ अशी मागणी अनेक सदस्यांनी यावेळी तावातावाने केली होती. स्वतंत्र गट तयार करण्याच्या पवित्र्यात २५ सदस्यांनी बंड करून बाहेर पडण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष सुनील माने यांना दिला होता.’
अर्थसंकल्पीय सभेआधी राष्ट्रवादीची पार्टी मिटिंग पार पडली. मिटिंगमध्येच नाराज मंडळींनी आपली ‘योजना’ ठरविली होती. ही सभा तहकूब करण्यास आपल्याच पक्षाला भाग पाडायचे, असे ठरविण्यात आले होते.
अर्थसंकल्पाच्या महत्त्वपूर्ण सभेला मुख्य कार्यकारी हजर राहत नाहीत, ही गंभीर बाब असल्याचे राष्ट्रवादीच्या अनिल देसाई, नितीन भरगुडे-पाटील व इतरांनी सांगितले. हे ‘आयतं कोलीत’ त्यांना मिळाले असल्याने सभा तहकुबीची मागणी त्यांनी केली. मात्र, विरोधकांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सभा घेण्याची मागणी केली होती. अध्यक्षांनी मात्र विरोधकांकडे दुर्लक्ष करून स्वपक्षातील नाराजांचीच बाजू घेऊन जिल्हा परिषदेत सत्ताधाऱ्यांत पडलेली ‘भेग’ मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र यानंतर विरोधकांसह राष्ट्रवादीमधील काही सदस्य अध्यक्षांच्या दालनात दाखल झाले. ही सभा तहकूब करणे चुकीचे असल्याची नाराजी त्यांनी अध्यक्षांजवळ व्यक्त केली.
जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीची सत्ता असली तरीही नाराज मंडळींनी सभागृहाचे कामकाज होतेच कसे ते पाहू?, असा सज्जड इशारा तब्बल महिनाभरापूर्वी दिला होता. हा इशारा अमलात आणण्यासाठी नाराज मंडळींनी अर्थसंकल्पीय सभेचा मुहूर्त साधला हेच म्हणावे लागेल. (प्रतिनिधी)


राज्याचा अर्थसंकल्प झाल्याशिवाय जिल्हा परिषदेचा अंक मंजूर करून घेणे, हे चुकीचे ठरले असते, म्हणून आम्ही त्याची जाणीव करून दिली. राज्याचा अर्थसंकल्प २० मार्चच्या आसपास मंजूर होईल, त्यानंतर जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प मंजूर करणे सोयीचे होईल.
- बाळासाहेब भिलारे, पक्षप्रतोद राष्ट्रवादी
जिल्हा परिषदेचा २५ कोटी इतक्या स्वनिधीचा हा अर्थसंकल्प आहे. त्याला मंजुरी दिल्यानंतर पुरवणी अर्थसंकल्पात काही बाबी घेता आल्या असत्या, परंतु सदस्यांचे समाधान महत्त्वाचे होते. त्यामुळे त्यांच्या मागणीनुसार सभा तहकूब केली.
- माणिकराव सोनवलकर, अध्यक्ष जिल्हा परिषद
यशवंत विचारांची परंपरा सांगणाऱ्या काही मंडळींनी जाणीवपूर्वक सभा तहकूब करायला भाग पाडले आहे. त्यांनी नाराजी व्यक्त करण्यासाठी साधलेली वेळ चुकीची ठरली आहे.
- शिवाजीराव शिंदे, कृषी सभापती
जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट आहे. या अर्थसंकल्पीय सभेमध्ये या दुष्काळी उपाययोजनांबाबतीत चर्चा घडून येणे आवश्यक होते. परंतु सभा तहकूब करायला लावणाऱ्यांना त्याचे काही नव्हते. सभा तहकूब करून त्यांनी काय साधले?
- अमित कदम, सभापती अर्थ व शिक्षण

Web Title: The absence of displeasure is the absence of absence!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.