अबब.. दंडाचा आकडा अर्ध्या कोटीवर !
By Admin | Updated: June 11, 2015 00:51 IST2015-06-10T21:56:16+5:302015-06-11T00:51:09+5:30
बेकायदा गौण खनिज : तस्करांच्या मानगुटीवर ‘महसूल’ची टाच; वाळू पाठोपाठ मुरूम वाहतूकदारांनाही दणका

अबब.. दंडाचा आकडा अर्ध्या कोटीवर !
संजय पाटील -कऱ्हाड --गत काही वर्षांत कऱ्हाड तालुक्याच्या भौगोलिकदृष्ट्या संपन्नतेचा पुरेपूर फायदा तस्करांनी उठवलाय. वाळू, मुरूम आणि माती या गौण खनिजाचं तस्करांनी जेसीबी लावून उत्खनन केलं. या उत्खननातून त्यांनी अक्षरश: खोऱ्यानं पैसाही ओढला. मात्र, गेल्या वर्षभरात या तस्करांच्या मुसक्या आवळण्याचं काम महसूल विभागाकडून सुरू आहे. ‘महसूल’ने गेल्या काही महिन्यांत बेकायदा गौण खनिजाचं उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारलाय. या कारवाईतून वसूल झालेली दंडाची रक्कम आता अर्ध्या कोटीवर पोहोचली आहे.
महसुलाच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यात कऱ्हाड तालुक्याचा प्रथम क्रमांक लागतो. कऱ्हाड हा भौगोलिकदृष्ट्या मोठा तालुका आहे. तालुक्याच्या पूर्वेकडील काही दुष्काळी गावे सोडली तर कृष्णा व कोयना या दोन मोठ्या नद्यांमुळे इतर भागात बागायती क्षेत्र व सुपिकता जास्त प्रमाणात आहे. तसेच येथे गौण खनिजही मोठ्या प्रमाणावर आढळते. कृष्णा, कोयना यासह अन्य उपनद्यांतील वाळू, नदीकाठची लाल माती व डोंगराळ भागातील मुरूम या गौण खनिजामुळे तालुक्यातून शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होतो. मात्र, या गौण खनिजाचे लूट करण्याचे प्रमाणही येथे जास्त आहे. तालुक्यात कृष्णा नदीमध्ये शासनाच्या माध्यमातून काही वाळू ठेके देण्यात आले आहेत. मात्र, अनेकवेळा या ठेक्यांव्यतिरिक्त इतर ठिकाणांहूनही बेकायदेशिररीत्या वाळूउपसा केला जातो. तसेच वाळू ठेक्यांवरही नियम धाब्यावर बसवून मर्यादेपेक्षा जास्त उपसा होतो. महसूल विभागाची परवानगी न घेता नदीकाठावरील लालमातीचे उत्खनन केले जाते. कधी-कधी लालमाती उत्खननासाठी परवाना घेतला जातो. मात्र, परवान्यापेक्षा किती तरी पटीने जास्त लालमातीचे उत्खनन करून नदीकाठ पोखरला गेल्याची उदाहरण आहेत. मुरूमाबाबतीतही तस्करांकडून हाच प्रकार होतो. महसूल विभागाला अंधारात ठेवून बेधडकपणे वाळू, लालमाती तसेच मुरूमाची लूट होते. संबंधित विभागातील काही महसूल कर्मचारीही या साखळीत गुंतल्याची चर्चा असते. मात्र, अद्यापतरी बेकायदा वाळू, माती व मुरूमाबाबत कोणत्याही महसूल कर्मचाऱ्यावर कारवाई झालेली नाही. गेल्या वर्षभरापासून महसूल विभागाने या तस्करांविरोधात कडक धोरण अवलंबण्यास सुरुवात केली आहे. बेकायदेशिररीत्या गौण खनिजाचे उत्खनन, उपसा किंवा वाहतूक करताना आढळल्यास संबंधितांवर महसूल विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे. वर्षभरात करण्यात आलेल्या एकूण कारवायांमध्ये वाळूबाबत झालेल्या कारवार्इंची संख्या जास्त आहे. मुरूम वाहतूकदारांवरही कारवाई करण्यात आली आहे.
आठपैकी तीन वाळू ठेके बंद
कऱ्हाड तालुक्यात कृष्णा नदीपात्रात यावर्षी वाळूचे आठ ठेके देण्यात आले होते. त्यापैकी गोळेश्वर-कार्वे, गोवारे, कोपर्डे हवेली-घोणशी, बेलवडे हवेली व कालगाव येथील वाळू ठेके सुरू आहेत, तर खराडे, नवीन कवठे व तासवडे येथील ठेके बंद असल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले. जुने कवठे-वडोली भिकेश्वर येथील एक अनधिकृत वाळू ठेका चार दिवसांपूर्वीच महसूल विभागाने उद्ध्वस्त केला आहे.
सर्वाधिक कारवाई वाळूची
एप्रिल २०१४ ते मार्च २०१५ या एका वर्षाच्या कालावधीत तसेच एप्रिल २०१५ ते आजअखेर गौण खनिज उत्खनन, उपसा व वाहतूक करणाऱ्या एकूण १०९ वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये सर्वाधिक वाहने वाळूची आहेत. एप्रिल २०१४ ते मार्च २०१५ या एका वर्षात वाळूच्या ४० वाहनांवर तसेच एप्रिल २०१५ ते आजअखेर वाळूच्या ४३ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यातून तब्बल ४० लाख ६१ हजार दंड वसूल झाला आहे.
मुरूमाच्या
२२ वाहनांना दंड
एप्रिल २०१४ ते मार्च २०१५ या एका वर्षाच्या कालावधीत मुरूमाची वाहतूक करणाऱ्या २२ वाहनांवर महसूल विभागाने कारवाई केली आहे. संबंधित वाहनधारकांकडून १ लाख २९ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. एप्रिल २०१५ ते आजअखेर मुरूमाच्या एकाही वाहनावर कारवाई झालेली नाही.
लालमातीकडे दुर्लक्ष
वाळू व मुरूमाविरोधात कडक धोरण अवलंबणाऱ्या महसूल विभागाचे लालमातीच्या उत्खननाकडे मात्र पूर्णत: दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. एप्रिल २०१४ ते मार्च २०१५ या एका वर्षात लालमातीची बेकायदा वाहतूक करणाऱ्या फक्त चार वाहनांवर कारवाई झाली आहे. संबंधितांना ६५ हजारांचा दंड करण्यात आला आहे.
गौण खनिजाच्या माध्यमातून शासनाला महसूल मिळतो; मात्र शासनाने घालून दिलेल्या नियमांचे व अटींचे व्यावसायिक पालन करीत नाहीत. त्यामुळे कारवाई करावी लागते. गौण खनिजाचे बेकायदेशिररीत्या उत्खनन करणाऱ्यांना चाप बसावा, त्यांना शिस्त लागावी, यासाठी यापुढे कडक धोरण अवलंबले जाणार आहे.
- किशोर पवार, प्रांताधिकारी, कऱ्हाड