सातारा : काही लोकांना धडक देऊन पळून जाणाऱ्या रिक्षा चालकाला थांबवताना रिक्षा चालकाने महिला पोलिसाला काही अंतर फरफटत नेले. यामध्ये महिला पोलिस गंभीर जखमी झाली. या प्रकरणी पोलिसांनी रिक्षा चालकाला ताब्यात घेतले असून, ही घटना सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता खंडोबाचा माळ परिसरात घडली. भाग्यश्री जाधव असे जखमी महिला पोलिसाचे नाव आहे. त्या वाहतूक शाखेत कार्यरत आहेत.मोळाचा ओढा परिसरात दाेन ते तीन जणांना धडक देऊन रिक्षा बसस्थानकाकडे आली आहे, अशी माहिती भाग्यश्री जाधव यांना मिळाली. त्या रिक्षाची वाट पाहतच होत्या. समोरून संबंधित रिक्षा येत असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी रिक्षा चालकाला हात दाखवून थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु, रिक्षा चालकाने न थांबताच खंडोबाचा माळ रस्त्याने रिक्षा सुसाट नेली. यानंतर जाधव यांनी तातडीने एका दुचाकीस्वाराला त्याचा पाठलाग करण्यास सांगितले. त्या दुचाकीवर पाठीमागे स्वत: बसल्या. खंडोबाचा माळ येथे त्यांनी रिक्षा चालकाला थांबवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु, त्या रिक्षा चालकाने त्यांचा हात झटकून रिक्षा तशीच पुढे नेली. याचवेळी जाधव यांच्या जर्किनची टोपी रिक्षाच्या पाठीमागील बंपरमध्ये अडकली. त्यामुळे त्या दुचाकीवरून खाली पडल्या. याच अवस्थेत रिक्षा चालकाने त्यांना काही अंतर फरफटत नेले. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी आरडाओरड केल्यानंतर रिक्षा चालकाने रिक्षा थांबवली. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले.
वाहतूक महिला पोलिसाला रिक्षाचालकाने नेले फरफटत, साताऱ्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 16:31 IST