महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा रस्त्यावर गुरुवारी संध्याकाळी एका माकडाने अचानक दुचाकीवर झडप टाकल्याने हा अपघात झाला. या अपघातात देवळी येथील आनंद सखाराम जाधव (वय ५०) यांचा जागीच मृत्यू झाला असून, पत्नी गंभीर जखमी झाली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुरुवारी सायंकाळी आनंद जाधव हे पत्नीसमवेत महाबळेश्वर शहरात कामे आटोपून दुचाकीवरून देवळी गावाकडे जात होते. तापोळा रस्त्यावरील चिखली परिसरात दुचाकीवरून जात असताना खाद्याच्या शोधात असलेल्या एका माकडाने अचानक दुचाकीवर झडप टाकली. त्यामुळे दुचाकीवरील ताबा सुटून दोघेही रस्त्यावर आपटले.अपघातात आनंद जाधव यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालय, महाबळेश्वर येथे हलविण्यात आले. उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. पत्नी जखमी असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.ग्रामस्थांची मोठी गर्दीया घटनेची माहिती मिळताच देवळी गावासह परिसरातील नागरिकांनी रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालय परिसरात मोठी गर्दी झाली होती. गावात व परिसरात शोककळा पसरली असून, जाधव कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.वाढत्या माकड उपद्रवाचा प्रश्नमहाबळेश्वर व आसपासच्या भागात माकडांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत आहे. पर्यटकांच्या हातातील खाद्यपदार्थ हिसकावणे, वाहनांवर झडप घालणे, अशा घटना नियमित घडत आहेत. काही महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे माकडामुळे अपघात होऊन काही नागरिक जखमी झाले होते. गुरुवारी झालेल्या या दुर्घटनेने माकडांच्या उपद्रवाचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.
प्रशासनाकडे मागणीपरिसरातील ग्रामस्थांनी वनविभाग व प्रशासनाकडे तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे. ‘दररोज रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या ग्रामस्थांना आणि पर्यटकांना धोका निर्माण होत आहे. आता तरी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत,’ अशी ग्रामस्थांची मागणी आहे.