सातारा : गुटखा व्यावसायिकाकडून दोन लाख रुपयांची खंडणी मागितली जात असल्याचा आरोप करत एका हातगाडीधारक दाम्पत्याने आज, शुक्रवारी दुपारी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी संबंधित दाम्पत्याला आंदोलनापासून प्रवृत्त करत ताब्यात घेतले असून, अचानक घडलेल्या या घटनेमुळे काही काळ तणाव निर्माण झाला.याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्हा रुग्णालय आवारात प्रकाश डागा व लक्ष्मी डागा यांची हातगाडी आहे. अनेक वर्षांपासून ते या ठिकाणी व्यवसाय करत आहेत. एक गुटखा व्यावसायिक त्यांच्याकडे दोन लाख रुपयांची खंडणी मागत असून, त्या व्यावसायिकावर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी डागा दाम्पत्याने शुक्रवारी दुपारी पोवई नाक्यावरील पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानासमोर अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. या ठिकाणी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत दाम्पत्याला आत्मदहनापासून प्रवृत्त करून ताब्यात घेतले.
साताऱ्यात पालकमंत्र्यांच्या घरासमोरच हातगाडीधारक दाम्पत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न, खंडणी मागितल्याचा आरोप
By सचिन काकडे | Updated: October 20, 2023 13:41 IST