पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यात मानव-वन्यजीव हल्ल्यामधील घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. रविवारी सकाळी पाचगणी येथे टेबल लँड परिसरात सकाळी फिरायला गेलेल्या एका नागरिकावर गव्याने हल्ला करून गंभीर जखमी केले. हिमेश पटेल असे जखमीचे नाव आहे. त्यांना पुढील उपचारासाठी पुण्याला हलविले आहे.पाचगणी येथील टेबल लँडवर रोज सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांची गर्दी असते. सकाळी अशाच पद्धतीने ललित मुथा आणि हिमेश पटेल हे दोन मित्र नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. त्यांना हा गवा तळवीजवळ दिसला. ललित मुथा यांनी आपल्या मित्राला हा गवा गोडवली हद्दीत मैत्री हॉटेलजवळ दिसला असल्याचे सांगितले. नंतर वॉक करून ललित मुथा हे गोडवलीकडे गेले तर हिमेश हे टेबल लँडवरून पाचगणीकडे उताराने रस्त्याने निघाले होते; परंतु मागून अचानक या गव्याने हिमेश यांच्यावर हल्ला केला. त्यावेळी हिमेश यांनी आरडाओरडा केला. तो ऐकून मुथा तातडीने मागे वळले. हिमेश गंभीर जखमी झाल्याचे पाहून त्यांनी लगेच एसओएस ग्रुपच्या सदस्यांना बोलावले. या सदस्यांनी त्वरित ॲम्ब्युलन्स आणली आणि जखमी हिमेश पटेल यांना बेल एअरमध्ये उपचारासाठी दाखल केले; परंतु त्यांना गंभीर जखम झाल्याने वाई येथे पाठवले. तेथूनही त्यांना उपचारासाठी पुणे येथे पाठवण्यात आले आहे.
Satara: पाचगणीतील टेबल लँड परिसरात गव्याचा वावर, फिरायला गेलेल्यावर नागरिकावर केला हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 12:22 IST