कोरेगावात ९३, जावळीत ७३ टक्के मतदान
By Admin | Updated: June 14, 2015 23:55 IST2015-06-14T23:53:07+5:302015-06-14T23:55:48+5:30
खरेदी-विक्री संघ निवडणूक : आज मतमोजणी; कडक पोलीस बंदोबस्तात मतदान

कोरेगावात ९३, जावळीत ७३ टक्के मतदान
कोरेगाव : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी शांततेत ९३.४६ टक्के मतदान झाले. सकाळपासून मतदानासाठी सभासदांनी गर्दी केली होती. तर जावळी खरेदी-विक्री संघासाठी ७३ टक्के मतदान झाले. दरम्यान, सोमवार, दि. १५ रोजी सकाळी ८ वाजता कोरेगाव
बाजार समिती आवारातील केडर सभागृहात तर कुडाळ येथष मतमोजणी केली जाणार आहे.
संघाच्या १५ जागांसाठी ३१ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले होते. मतदान केंद्रांवर सकाळपासून मतदानासाठी सभासदांनी गर्दी केली होती. दोन्ही पॅनेलचे पदाधिकारी मतदान केंद्राजवळ तळ ठोकून होते. संघाचे दोन हजार ४६३ सभासद मतदानासाठी पात्र होते.
सोनके येथे ४४८ पैकी ४४०, सातारारोड येथे ४२० पैकी ३८०, कोरेगाव येथे ५२७ पैकी ४८७, कुमठे येथे ३८२ पैकी ३५४, रहिमतपूर येथे ४५१ पैकी ४२२ तर वाठार किरोली येथे २३५ पैकी २१९ सभासदांनी मतदान केले. एकूण दोन हजार ३०२ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. त्याचे प्रमाण ९३.४६ टक्के एवढे आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी मधुकर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश धस, सहायक पोलीस निरीक्षक यशवंत ढगे व एस. व्ही. निकम यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. (प्रतिनिधी)