बावधन बगाडप्रकरणी ८३ जणांना जामीन, तर आणखी १३ जण ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:41 IST2021-04-04T04:41:00+5:302021-04-04T04:41:00+5:30
वाई : बावधन ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला आदेश झुगारून बगाड मिरवणूक काढल्याने १०६ लोकांची नावे निष्पन्न झाली असून शुक्रवार दिनांक ...

बावधन बगाडप्रकरणी ८३ जणांना जामीन, तर आणखी १३ जण ताब्यात
वाई : बावधन ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला आदेश झुगारून बगाड मिरवणूक काढल्याने १०६ लोकांची नावे निष्पन्न झाली असून शुक्रवार दिनांक २ रोजी ८३ नागरिकांना बगाड मिरवणूक संपताच बगाड्यासह ताब्यात घेतले होते, त्या सर्वांना प्रथम वर्ग न्यायाधीश व्ही. एन. गिरवलकर यांच्यासमोर उभे केले असता, पाच हजार रुपये वैयक्तिक जामिनावर त्यांना रात्री अकरा वाजता मुक्त करण्यात आले. तसेच, शनिवार दिनांक ३ रोजी आणखी १३ जणांना ताब्यात घेतले असून उर्वरित जणांचा शोध सुरु आहे.
बावधन यात्रेच्या गुरुवार दिनांक १ रोजी रात्री छाबिन्या दिवशी मिरवणूक काढल्याने बावधन मधील भैरवनाथाच्या पालखीच्या दहा मानकऱ्यांना व वागजाईवाडी पालखीच्या चार जणासह अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचा शोध पोलीस घेत आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी दिली. नागरिकांवर बेकायदेशीर जमाव जमवाने, सरकारी आदेशाचा भंग करणे, कोरोना संसर्ग प्रसारास कारणीभूत ठरणे, प्राण्यांना निर्दयीपणे वागवणे अशी कलमे लावण्यात आली आहेत. दरम्यान खासदार उदयनराजे भोसले यांनी वाई पोलीस ठाण्यास भेट देऊन शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजता अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्याशी याप्रकरणी चर्चा करून ग्रामस्थांना सहकार्य केले.