‘कृष्णा’च्या पुरवणी यादीतील ८२० सभासद क्रियाशील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:42 IST2021-05-21T04:42:20+5:302021-05-21T04:42:20+5:30
प्रमोद सुकरे कराड कृष्णा सहकारी साखर कारखान्यात अक्रियाशील केलेले वर्गीकरण रद्द करावे, असा निर्णय सहकारमंत्री बाळासाहेब पाटील ...

‘कृष्णा’च्या पुरवणी यादीतील ८२० सभासद क्रियाशील
प्रमोद सुकरे
कराड
कृष्णा सहकारी साखर कारखान्यात अक्रियाशील केलेले वर्गीकरण रद्द करावे, असा निर्णय सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी गुरुवारी दिला. त्यामुळे पुरवणी यादीतील ८२० सभासद क्रियाशील ठरत असल्याने त्यांना मतदानाचा अधिकार मिळू शकतो. सहकारमंत्र्यांच्या या निर्णयावर आता न्यायालय अंतिम काय निर्णय घेणार हे पाहावे लागणार आहे.
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यात निवडणूकपूर्व प्रक्रिया सुरू झाली आहे. कच्ची मतदार यादी प्रसिद्धी, हरकती, सुनावणी हे सोपस्कार पार पडल्यावर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. त्या अंतिम मतदार यादीला ८२० सभासदांची पुरवणी यादी जोडली गेली आहे. या सभासदांच्या क्रियाशील अक्रियाशीलतेचे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. न्यायालयात दोन तारखांमध्ये झालेल्या युक्तिवादानंतर न्यायालयाने याबाबतचा निर्णय अगोदर सहकार मंत्र्यांनी द्यावा, असा आदेश दिला होता. त्यानुसार सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी गुरुवारी आपला निर्णय दिला आहे.
सहकारमंत्र्यांनी दिलेल्या निर्णयात म्हटले आहे की, ५ मे २०२१ च्या आदेशानुसार कारखान्याने अक्रियाशील केलेले वर्गीकरण रद्द करावे. याचा अर्थ असा होतो की ते सभासद क्रियाशील आहेत. दरम्यान सहकारमंत्र्यांनी दिलेल्या या निर्णयावर न्यायप्रविष्ट असलेल्या बाबीत न्यायालय नेमका काय निर्णय घेणार, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
वास्तविक मतदार यादी जाहीर झाल्यानंतर १९ दिवसांचे आत निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे कायद्याने गरजेचे आहे. २५ मेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करू शकतात. त्यामुळे सहकारमंत्र्यांच्या निर्णयानंतर न्यायालय नेमका काय निर्णय घेते हे महत्त्वाचे ठरणार आहे. न्यायालयाने त्वरित निर्णय दिल्यास निवडणूक कार्यक्रम जाहीर होणे सोयीचे होणार आहे.
दरम्यान, कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीसाठी डॉ. सुरेश भोसले यांचे सहकार पॅनेल, डॉ. इंद्रजीत मोहिते यांचे रयत पॅनेल तर अविनाश मोहिते यांचे संस्थापक पॅनेल या तिघांचीही सध्या जोरदार तयारी दिसत आहे. सभासदांच्यातही निवडणुकीबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.
फोटो
कृष्णा कारखाना संग्रहित फोटो वापरणे