सातारा जिल्ह्यात दोन दिवसांत ७८ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:34 IST2021-05-03T04:34:44+5:302021-05-03T04:34:44+5:30
सातारा: जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे तांडव सुरू असून, गत दोन दिवसांत तब्बल ७८ जणांचा कोरोनाने बळी घेतला ...

सातारा जिल्ह्यात दोन दिवसांत ७८ जणांचा मृत्यू
सातारा: जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे तांडव सुरू असून, गत दोन दिवसांत तब्बल ७८ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. ही जिल्ह्यासाठी अत्यंत चिंताजनक बाब असून, प्रशासन अक्षरश: हतबल झाले आहे. तसेच दोन दिवसांत नवे ४ हजार ६०० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून, बळींची संख्या २ हजार ५७४ वर, तर कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख ७ हजार ४७२ वर पोहोचला आहे.
जिल्ह्यात अलीकडे मृत्यू होण्याचे प्रमाण चिंताजनक असून, मृत्यू झालेल्यांमध्ये वृद्धांची संख्या लक्षणीय आहे. नागरिक अंगावर आजार काढत असल्याचा निष्कर्ष प्रशासनाने काढला आहे.
सातारा शहरात बाधित होण्याचे प्रमाण मोठे आहे. शनिवारी एकाच दिवशी ५१५ जण बाधित आढळून आले आहेत. शहरातील प्रामुख्याने मोजक्याच भागाला कोरोनाचा विळखा पडला आहे. करंजे, मंगळवार पेठे, राजसपुरा पेठेचा काही भागांत कमी रुग्ण आढळून येत आहेत, तर शहरातील गोडोली, शाहूनगर या भागात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत.
दरम्यान, कोरोनामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. कोणाच्या घरातील करता व्यक्ती, तर कोणाच्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती बळी गेल्याच्या घटना घडत आहेत. ब्रेक द चेनमुळे रस्ते ओस असले तरी त्या रस्त्यावरून रुग्णवाहिका सायरन वाजवत जाताना काळजात धडकी भरवून जात आहे. सातारा शहरात आतापर्यंत १२७ जणांचा बळी गेला आहे. तालुक्यात कोरोना बळीं जाण्याचे प्रमाण वाढत आहे. विशेष करून शहरातील मध्यमवर्गीयांना कोरोनाने चांगलेच त्रस्त आहे. कोरोनाची साखळी काही केल्या तुटत नाही. मृत्यू रोखण्यासाठी प्रशासन जीव तोड मेहनत घेत आहे. परंतु किरकोळ आजार अंगावर काढल्याने कोरोनाचा बळी पडण्याचे प्रकार वाढत असल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे. मृतांमध्ये सातारा तालुका नंबर वनला, तर वाई तालुका द्वितीय नंबरला आहे. वाई तालुक्यात काही गावांमध्ये आणि वाई शहरात संसर्ग तुटत नाही.त्यामुळे बाधित होण्याचे प्रमाण मोठे आहे.
एकीकडे कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी कोरोना मुक्तीचेही प्रमाण चांगले आहे. रविवारी दिवसभरात ४४० जण, तर आतापर्यंत ८४ हजार २५९ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
चौकट : सातारा तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट
जिल्ह्यात सर्वांत महाभयंकर परिस्थिती सातारा शहर आणि तालुक्यात आहे. सातारा तालुका हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला असून, रविवारी या तालुक्यात तब्बल ४९४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले, तर १३ जणांचा मृत्यू झाला. त्यापाठोपाठ कराड तालुक्यामध्ये २६३ बाधित, तर १० जणांचा मृत्यू झालाय. तसेच जावळी, कोरेगाव, महाबळेश्वर आणि पाटण या तालुक्यांमध्ये रविवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही. त्यामुळे प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. मात्र या तीन तालुक्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. याशिवाय खटाव तालुक्यांमध्ये ६, माण तालुक्यामध्ये २ आणि वाई तालुक्यामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय कराड तालुक्यामध्ये ही रुग्णसंख्या वाढत असून, रविवारी नवे २६३ रुग्ण आढळून आले आहेत.