जिल्ह्यात चार वर्षांत ७६ हजार महिलांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:41 IST2021-03-09T04:41:48+5:302021-03-09T04:41:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : प्रसूतीच्या वेळी महिला बाळालाच जन्म देत नाही तर ती सुद्धा पुनर्जन्म घेते. प्रसूती पहिल्या ...

जिल्ह्यात चार वर्षांत ७६ हजार महिलांना
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : प्रसूतीच्या वेळी महिला बाळालाच जन्म देत नाही तर ती सुद्धा पुनर्जन्म घेते. प्रसूती पहिल्या वेळेची असेल तर अधिक गुंतागुतीची ठरू शकते. अशा मातांना वंदन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरू केली असून मागील चार वर्षांत जिल्ह्यातील ७६ हजार महिलांना लाभ मिळालेला आहे. तर या अंतर्गत पाच हजारांची मदत दिली जात असून त्यासाठी १५० दिवसांच्या आत नोंदणी करणे आवश्यक असते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३१ डिसेंबर २०१६ मध्ये प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरू केली. या योजनेची घोषणा करण्यापूर्वी देशातील ५३ जिल्ह्यात इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना होती. महाराष्ट्रातील भंडारा आणि अमरावती या दोनच जिल्ह्यात ही योजना लागू होती. या योजनेचे महत्व ओळखून केंद्र शासनाच्या महिला व बालकल्याण मंत्रालयाने संपूर्ण भारतात योजना लागू करण्याचे ठरविले. त्याला मान्यता मिळून आता प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अस्तित्वात आली. महाराष्ट्रात ८ डिसेंबर २०१७ ला ही योजना सुरू झाली.
योजना सुरू करण्याचा उद्देश म्हणजे दारिद्र्य रेषेखालील गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत काम करावे लागते. तसेच प्रसूती नंतर शारीरिक क्षमता नसतानाही मजुरीसाठी कामावर जावे लागते. अशा महिला व माता कुपोषित राहून तिच्या नवजात बालकाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. यामुळे माता आणि बालमृत्यू दरात वाढ होते. या दोघांचेही आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती महिला व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करुन मृत्यूदर घटावा म्हणून ही योजना सुरू करण्यात आली.
केंद्रस्तर योजना महिला व बालकल्याण मंत्रालय राबवत असले तरी याची उपयोगिता व अनुषंगिक फायदे ओळखून महाराष्ट्रात ही योजना सार्वजनिक आरोग्य विभागाकडे देण्यात आलेली आहे. आरोग्य विभाग राष्ट्रीय आरोग्य अभियान पहिल्यापासूनच राबवत आहे. या अभियानाचे उद्दिष्टही माता आणि बालमृत्यू दर कमी करणे हेच आहे.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचे स्वरुप म्हणजे लाभार्थ्यांच्या त्यांच्या आधारकार्ड लिंक असणाऱ्या बँक खात्यात तीन टप्प्यात ५ हजार रुपये जमा करण्यात येतात. तसेच जननी सुरक्षा योजनेचा अतिरिक्त लाभ या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना मिळतो. अशा प्रकारे ६ हजार रुपये लाभार्थ्यांना मिळत असतात. पहिला टप्पा १ हजार रुपयांचा प्राप्त करण्यासाठी लाभार्थींनी गर्भवती असताना म्हणजे १५० दिवसांच्या आत नोंदणी करणे आवश्यक असते. त्यामुळे पहिल्या तिमाहीमध्ये लाभार्थीची वैद्यकीय तपासणी होईल. तसेच वेळीच तपासणी झाल्यामुळे आवश्यक वैद्यकीय सल्ला आणि उपचार मिळतो.
लाभासाठी यांना संपर्क साधा...
आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, आरोग्य उपकेंद्र, आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयात संपर्क साधून लाभ घेता येतो.
.........................
आवश्यक कागदपत्रे...
- लाभार्थी व तिच्या पतीचे आधारकार्ड
- लाभार्थींचे आधार संलग्न बँक खाते
- गरोदरपणाची शासकीय आरोग्य संस्थेत १५० दिवस आधी नोंद
- शासकीय संस्थेत गर्भवती काळात तपासणी
- बाळाचा नोंदणी दाखला व प्राथमिक लसीकरण
या सर्व अटींची पूर्तता केल्यानंतर ३० दिवसांत लाभाची रक्कम अदा केली जाते.
पहिला टप्पा १०००
दुसरा टप्पा २०००
तिसरा टप्पा ३०००
.......................................
२०२०-२१ मध्ये जानेवारीअखेर प्रसूती झालेल्या महिलांची संख्या - ३२४१०
खासगी रुग्णालय - २२६८१. शासकीय रुग्णालय ९७२९
........................
२०१९-२० वर्षात प्रसूती झालेल्या महिलांची संख्या ४४६४५
खासगी रुग्णालये २९२५७ शासकीय रुग्णालये १५३८८
.......................................................
लाभ घेतलेल्या महिलांची संख्या
२०१७-१८ १९२४६
२०१८-१९ १९९५४
२०१९-२० २०८६८
२०२०-२१ १७१२८
....................................................................